जलस्त्रोत आटल्याने खर्डी पाणीपुरवठा योजना बंद

जलस्त्रोत आटल्याने खर्डी पाणीपुरवठा योजना बंद
Published on

खर्डी, ता. २६ (बातमीदार) : भातसा जलस्रोतातील पाणी आटल्याने पाणी खेचण्याचा पंप चिखलात रुतला होता. त्यामुळे मागील सात दिवसांपासून खर्डी पाणीपुरवठा योजना बंद असल्याने ऐन पावसाळ्यात खर्डीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
खर्डी पाणीपुरवठा योजनेच्या भातसा धरणातील जलस्त्रोतजवळील पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे योजनेचा पाणी खेचण्याचा पंप येथील गाळात तीन दिवस अडकला होता. सद्यस्थितीत तो काढण्यात आला आहे. पाणी असलेल्या ठिकाणी पंप नेण्यासाठी पाईप लावणे, वायर जोडणे, तसेच जास्त दूरवरून पाणी खेचण्याची पंपाची क्षमता नसणे, अशा अनेक तांत्रिक अडचणींमुळे योजना पूर्णतः बंद झाली आहे, तर ऊन-पावसाचा खेळ सुरू असून मागील सात दिवसांपासून पावसाची उघडीप सुरू आहे. त्यामुळे विहिरीतही पाणी साचत नसल्याने महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. खासगी बोअरवेल, टॅंकर व बिसलरीच्या पाण्यावर रोज २०० ते २५० रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे घरातील बजेट कोलमडल्याने महिला हवालदिल झाल्या आहेत. पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे उपसरपंच मौसीन शेख यांनी सांगितले.

पाणीटंचाईमुळे खर्डीतील रहिवाशांना घराच्या छपरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिक ग्रामपंचायतच्या नियोजनाबाबत तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. पाणीपुरवठा योजना बंद असेपर्यंत पिण्याच्या पाण्याची टँकरने सोय करावी, अशी मागणी महिलावर्ग करीत आहे, तसेच बिसलरीच्या जारचे पाणी विकत घेण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. सर्वसामान्य लोक १०० रुपये बैरल (टिप) प्रमाणे खासगी टँकरवाल्याकडून पाणी विकत घेत आहेत.

पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत ग्रामपंचायतीने टॅंकरने पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
- प्रशांत खर्डीकर, सदस्य, ग्रा.पं. खर्डी.

खर्डी पाणीपुरवठा योजनेचा जलस्रोत आटल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. पंप पाण्याच्या ठिकाणी नेण्यासाठी संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. त्यातील तांत्रिक अडचण सोडवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तोपर्यंत गरज असलेल्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
-एम. बी. परमार, ग्रामविस्तार अधिकारी, खर्डी.

दळखण ग्रामपंचायतमधील जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेच्या भातसा जलस्त्रोतजवळीलही पाणी पूर्णपणे आटले आहे. येथील पाणीपुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. परिणामी येथील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तसेच विकतचे पाणी घेण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. येथील तांत्रिक अडचण सोडविण्याचे काम सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- लवेश वाघ, सरपंच, खर्डी ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com