येऊरमध्ये नियम, कायदे धाब्यावर

येऊरमध्ये नियम, कायदे धाब्यावर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : येऊर हे पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र आहे. येथे रात्री ११ नंतर प्रवेशबंदी असते. येथे अनधिकृत बांधकामांचे नळपाणी तोडण्याची कारवाई होते, तर कधी बेकायदा हॉटेल्स, बारवर बुलडोझर फिरवला जातो. तरीही सर्व नियम, कायदे धाब्यावर ठेवत येऊरमध्ये राजरोसपणे अवैध धंदे सुरूच आहेत. डीजे आणि मद्यपींच्या गोंगाटामुळे येथील आदिवासींची झोप उडाली आहे, तसेच परिसरात असुरक्षिता वाढली आहे. त्यात शनिवारी (ता. २९) क्रिकेटप्रेमींची त्यात भर पडून आदिवासी पाड्यांची शांतता भंगली. त्यामुळे आता दिखाऊपणासाठी कारवाईचा फार्स नको, तर कायमचा बंदोबस्त करा, या मागणीसाठी येथील आदिवासी एकवटले असून त्यांनी आंदोलन पुकारले आहे.

मुंबई-ठाण्यातील सिमेंटच्या बजबजपुरीत विस्तीर्ण पसरलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा येऊर हा भाग आहे. ठाणे शहराला खेटून आणि वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या येऊरमध्ये सात आदिवासी पाडे आहेत. सुमारे साडेतीन हजार इतकी लोकसंख्या या भागात आहे. निसर्गाचे वरदान लाभलेले हे क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून आधीच घोषित झाले आहे. असे असतानाही येथे गेल्या काही वर्षांत बेकायदा बंगले, हॉटेल्स, बार, टर्फची गर्दी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात रात्रभर पार्ट्या, डीजेचा मोठ्या प्रमाणात आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट टर्फ, दारू व अमली पदार्थ विकणे, लग्न पार्ट्यांचा कचरा जंगलात टाकणे, अनधिकृत पार्किंग हे सर्व प्रकार खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे आतापर्यंत संयमी भूमिकेत असलेला येथील आदिवासी समाज अस्वस्थ झाला आहे.

रात्री उशिरा रस्त्यावर सतत मद्यधुंद पर्यटकांच्या उपस्थितीमुळे आदिवासी महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. हॉटेल्स आता दारात पोहोचल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करतानाही अडचणी येत असल्याचा आरोप होत आहे. गेल्यावर्षी वन हक्क समितीने या जंगलावर प्रथम अधिकार असलेल्या वन्यजीवांवर काय परिणाम होत आहेत, याचे प्रात्यक्षिक दाखवत हे प्रकार थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले; मात्र थातुरमातुर कारवाईनंतर पुढे काहीच झाले नसल्याचा आरोप होत आहे. वास्तविक यापूर्वीही अशाप्रकारे अनेक आंदोलने झाली. पर्यावरणप्रेमींनी शासनदरबारी अनेक विनंती अर्ज केले. लोकप्रतिनिधींनीही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला अजूनही जाग आलेली नसल्याचा संताप व्यक्त होऊ लागला आहे.

रात्री ११ नंतरही वर्दळ
राष्ट्रीय उद्यानाचे दरवाजे रात्री आठ ते १० च्या आत बंद केले जातात. येऊरचे दरवाजे मात्र उच्च न्यायालयाच्या विशेष परवानगीमुळे रात्री ११ वाजता बंद करण्यास मुभा आहे. त्यानुसार रात्री ११ वाजेपर्यंत येऊर बंद व्हायला हवे, पण येऊर पहाटे सहा वाजेपर्यंत सुरू असते. येथील एकाही बारला अग्निशमन दलाचा परवाना नाही. मद्यविक्रीची परवानगी नाही. तरीही बंदी असताना राजरोसपणे ढाबे व हॉटेल्सवर तळीरामांच्या पार्ट्या होतात. जागोजागी लावण्यात येत असलेल्या विद्युत दिव्यांमुळे वन्यजीवांनाही धोका निर्माण झाला असल्याची कैफियत पर्यावरणप्रेमींनी मांडली आहे.

न्यायालयीन सुनावणीची प्रतीक्षा
गेल्यावर्षी जून २०२३ मध्ये पर्यारवणप्रेमी रोहित जोशी यांनी न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिता दाखल केली होती. ऑगस्टमध्ये त्याची पहिली सुनावणी झाली, तेव्हा न्यायालयाने ठाणे पालिका, वन विभाग, पोलिस अशा सर्वच संबंधित विभागाचे कान टोचत कारवाईचे आदेश दिले, तसेच सत्य परिस्थितीची पडताळणी करून अहवाल सादर करण्यासाठी ठाणे पालिकेला चार आठवड्यांची मुदत दिली, पण वर्षभरानंतरही तो अहवाल अजूनही सादर झालेला नाही. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील सुनावणी घेण्यात यावी, यासाठी तीन वेळा प्रयत्न करण्यात आले, पण अजूनही न्यायालयाच्या पटलावर हे प्रकरण न आल्याने पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com