ठाण्यात एक लाख झाडे लावणार

ठाण्यात एक लाख झाडे लावणार

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात’ आतापर्यंत २७ हजार ३३७ झाडे लावण्यात आली आहेत. एक लाख झाडे लावण्याचे लक्ष्य महापालिका १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात’, कृषी दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता. १) सकाळी बाळकूम येथील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंद दिघे उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
वृक्षारोपणाची सुरुवात ही महाराष्ट्राचे राज्यफूल असलेल्या ‘ताम्हण’ या झाडाच्या रोपणाने करण्यात आली. याप्रसंगी ताम्हण या वृक्षाचे वैशिष्ट्य व महत्त्व वृक्ष प्राधिकरणाचे वृक्षाधिकारी केदार पाटील यांनी सांगितले. या परिसरात एकूण ३०० झाडे लावण्यात आली. त्यात ताम्हणसोबतच बकुळ, जांभूळ, कडुनिंब, कांचन, बेहडा, महोगनी, बांबू आदींचा समावेश आहे. जोशी-बेडेकर महाविद्यालय आणि देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालय यांच्या एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थी उपकेंद्र परिसरातील वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत, रोटरी क्लबच्या सदस्यांनीही वृक्षारोपण केले. कृषी दिनाच्या औचित्याने सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात वृक्षारोपण करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या सहभागातून येत्या १५ ऑगस्टपर्यंत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या हरित ठाणे अभियानास लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन आयुक्त राव यांनी केले.
उपकेंद्राच्या परिसराचे रुपडे पालटून टाकण्याची गरज आहे. त्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. त्यांना महापालिका सर्वतोपरी मदत करेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. या बदलांसाठी सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी महापालिका मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री देईल. त्यात परिसरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही श्रमदानाच्या माध्यमातून सहभाग घ्यावा, म्हणजे त्यांच्यात स्वच्छतेचे संस्कार रुजतील, असेही राव यांनी सांगितले. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त (उद्यान) सचिन पवार उपकेंद्रांचे संचालक अद्वैत वैद्य, जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
..................................
आतापर्यंत २७ हजार ३३७ वृक्षारोपण
ठाणे महापालिकेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ५ जून रोजी कॅडबरी नाका येथे वृक्षारोपण करून ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियाना’ची सुरुवात केली. महापालिका क्षेत्रातील शासकीय; तसेच खासगी जागांवर १५ ऑगस्टपर्यंत एक लक्ष स्थानिक प्रजाती, विशेषतः बांबू लागवड करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. अभियानाअंतर्गत आतापर्यंत २७ हजार ३३७ झाडे लावण्यात आली आहेत. उर्वरित झाडांच्या रोपणाचे नियोजन केले आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार ही झाडे लावली जात आहेत.
..............................
२०४ शाळा- महाविद्यालयातून निघाल्या वृक्षदिंडी
कृषी दिनाचे औचित्य साधून ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियाना’चा संदेश घरोघरी नेण्यासाठी ठाणे महापालिकेच्या शाळा आणि खासगी शाळा यांच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने परिसरात छोटेखानी वृक्षदिंड्यांचे आयोजन केले होते. पालिका क्षेत्रातील १२९ पालिका शाळा, ७० खासगी शाळा आणि पाच महाविद्यालयांतील सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन परिसरामध्ये वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण केले. त्यांनी ५४०० रोपांची लागवड केली. विविध ठिकाणी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांसह महापालिकेच्या उपायुक्त (पर्यावरण) अनघा कदम आणि मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com