आरोग्यवर्धक रानभाज्यांना पर्यटकांची पसंती

आरोग्यवर्धक रानभाज्यांना पर्यटकांची पसंती

Published on

मनोर, ता. २ (बातमीदार) : नैसर्गिक रानभाज्या विक्रीतून आदिवासी महिलांना हक्काचा रोजगार मिळत आहे. भातशेतीच्या कामातून वेळ काढत कुटुंबाचा रहाटगाडा हाकण्यासाठी पावसाळ्यात जंगलात उगवणारी शेवळी, करडू, कोळी भाजी, बांबूची शिन, माटभाजी, दिंडे आणि खापरासारख्या रानभाज्यांची रस्त्यालगत बसून विक्री केली जात आहे. रानभाज्यांसोबत गावरान कोंबडे, चिंबोऱ्या आणि खेकड्यांच्या विक्रीतून आदिवासी महिलांना चांगले उत्पन्न मिळत आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पर्यटक रानभाज्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

पावसाळ्यात हाताला काम नसल्याने उत्पन्नाचे साधन म्हणून रानभाज्यांच्या विक्रीकडे आदिवासी महिलांचा कल दिसून येतो. पावसाळ्याला सुरुवात होताच जंगलात रानभाज्या उगवण्यास सुरुवात होते. रानभाज्यांबाबत उत्तम ज्ञान असलेले आदिवासी बांधव जंगलातून रानभाज्या शोधून आणतात. शेवळी, कोली भाजी, टाकळा, खापरा, माटभाजी, बांबूची शिंद, करडूसारख्या रानभाज्या रस्त्यालगत उपलब्ध झाल्या आहेत. रस्त्यालगत विक्रीला बसलेल्या महिलांच्या रानभाज्यांना पर्यटक आणि शहरी ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे.

वरई-पारगाव रस्त्यावर गुंदावे गावच्या हद्दीत आठवड्याचे शेवटचे दोन दिवस रानभाज्यांची विक्री जोरात होते. वरई-पारगाव रस्त्यावरून केळवे समुद्रकिनाऱ्याकडे जाणारे पर्यटक, सफाळे आणि पालघरच्या दिशेने जाणारे शासकीय अधिकारी, कारचालक आणि गृहिणी रस्त्यालगत बसलेल्या आदिवासी महिलांकडून रानभाज्या खरेदीसाठी गर्दी करतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला नेहमीच्या वापरातील भाज्यांची आवक कमी होत असल्याने ग्राहकांची रानभाज्यांना पसंती मिळते. दिवसभराच्या विक्रीतून साधारणत: अडीचशे ते तीनशे रुपये मिळत असल्याची माहिती विक्रेत्या महिलेने दिली.

रानभाज्यांचे दर
कोली भाजी १५ रुपये जुडी
करडू १५ रुपये जुडी
शेवली २५ रुपये जुडी
दिंडे १५ रुपये जुडी
खापरा १५ रुपये जुडी
शिन २० रुपये वाटा
करवंद १० रुपये वाटा
टाकळा १० रुपये जुडी

विक्रीसाठी स्टॉल्स देण्याची मागणी
रानभाज्यांसोबत घरात पाळलेले गावरान कोंबडे आणि ओहोळात मिळणाऱ्या चिंबोऱ्या (खेकडे) विक्रीसाठी ठेवले जात आहेत. वरई-पारगाव रस्त्यावर गुंदावे गावच्या हद्दीत असलेल्या वळणाजवळच्या रस्त्यालगत आदिवासी महिला रानभाज्यांच्या विक्रीसाठी बसलेल्या असतात. यावेळी भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहक वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वन विभागाच्या जागेत आदिवासींना विक्रीसाठी स्टॉलसह रस्त्यालगत पार्किंगसाठी जागा उपलब्ध देण्याची मागणी आदिवासी महिलांनी केली आहे.

वन व्यवस्थापन समितीच्या निधीतून महिलांना शेड बांधून देण्याच्या सूचना स्थानिक वनपालांना केल्या जातील. वन व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन कार्यवाही केली जाईल.
- हृषीकेश वाघमारे, वन परिक्षेत्र अधिकारी, दहिसरतर्फे मनोर

कुटुंबातील पुरुष मंडळी जंगलात जाऊन रानभाज्या शोधून आणतात. त्यानंतर रस्त्यालगत बसून विक्री करतात. रानभाज्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून कुटुंबाला हातभार लागतो. शनिवार आणि रविवारच्या दिवशी केळवे समुद्रकिनाऱ्यावर जाणारे पर्यटक रानभाज्यांची खरेदी करतात.
-ममता पाडोसा, भाजी विक्रेती, गुंदावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.