कासा ते चारोटी राज्यमार्गावर कोंडी

कासा ते चारोटी राज्यमार्गावर कोंडी

Published on

कासा, ता. २ (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील तलवाडा, कासा, चारोटी मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. सध्या मनोर, वाडा मार्गावरील पूल नादुरुस्त असल्याने अवजड वाहतूक बंद आहे. परिणामी महामार्गावरील वाहतूक विक्रमगड-तलवाडा, कासामार्गे महामार्गाकडे वळवली आहे. त्यात कासा बाजारपेठेतच चार लहान-मोठ्या शाळा आहेत. या शाळांमध्ये जवळपास तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत जाणारी मुले सकाळी व संध्याकाळी या रस्त्यावरून चालत अथवा रिक्षाने प्रवास करीत असतात. त्यामुळे येथे होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. त्याचबरोबर अपघाताची भीती व्यक्त होत आहे. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नागरिकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे.

चार दिवसांपूर्वी बोईसर येथील नागझरी येथे शाळकरी मुले रस्ता ओलांडताना दोन मुलांचा अपघात झाला आहे. यात एका मुलाचा जीव गेला, तर दुसरा गंभीर असून उपचार घेत आहे. त्याचप्रमाणे सोमवारी कासाजवळ याच रस्त्यावर वेती येथे शाळकरी रिक्षाला अपघात झाल्याने तीन मुली गंभीर जखमी झाल्या. यात एका मुलीला आपला जीव गमवावा लागला, तर दोघी गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा प्रश्न शासनाने सोडवावा, यासाठी पालक, नागरिक आक्रोश करीत आहेत.

सध्या तलवाडा, कासा, चारोटी राज्य मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या मोठ्या वजनी वाहनांमुळे येथील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. वेती ते चारोटीदरम्यान खूप मोठे धोकादायक खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करावी, यासाठी स्थानिक कासा पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

गेल्या अनेक महिन्यांपासून कासा, चारोटीदरम्यान अवजड वाहनांमुळे हा राज्य मार्गदेखील खड्डेयुक्त झाला आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी विद्यार्थी, नागरिक त्रस्त आहेत. जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागत आहे. स्थानिक पोलिस प्रशासनानेदेखील या अवजड वाहतुकीकडे लक्ष द्यावे.
- संतोष देशमुख. शिवसेना डहाणू तालुका प्रमुख.

मनोर-वाडा मार्गावर खड्डे पडले आहेत. परिणामी येथे वाहतूक कोंडी होत आहे. प्रशासनाने महामार्गावरील वाहतूक या राज्य मार्गावर येऊ नये, यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. या महामार्गावरील वाहने वाडा, सायवन चारोटीमार्गे कासा बाजारपेठेतून जातात. सायवन नाका, चारोटी नाका येथे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसाची नेमणूक केली जाणार आहे.
- नामदेव बंडगर, पोलिस निरीक्षक, कासा पोलिस ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.