जुन्या चाळी, झोपडपट्टीतील नागरिकांना ३०० युनिट पर्यंत विन मोफत वीज मिळावी

जुन्या चाळी, झोपडपट्टीतील नागरिकांना ३०० युनिट पर्यंत विन मोफत वीज मिळावी

मोफत विजेसाठी आंदोलन
३०० युनिट वीज मोफत देण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्लीच्या धर्तीवर ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता. २) आंदोलन करण्यात आले. त्यानंतर यासंदर्भात महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम यांना निवेदन देण्यात आले.
सध्याच्या परिस्थितीत वीज दरवाढीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येत आहे. जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. अशा परिस्थितीत वीज दरवाढीमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक भार वाढला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. वीज ही एक मूलभूत गरज असून त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी. त्यामुळे शहरातील जुन्या चाळी, गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी दिल्ली धर्तीवर ३०० युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी. या मागणीचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही केदार दिघे यांनी दिला. यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर, जिल्हा संघातिका समिधा मोहिते, जिल्हा संघटिका आकांक्षा राणे, शहरप्रमुख प्रदीप शिंदे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

..
वीज दरवाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. महायुतीच्या चुकीच्या नियोजनामुळे वीज दरवाढ झाली असून सर्वसामान्यांना जास्तीची किंमत मोजावी लागत आहे. वीज दरवाढीमुळे आर्थिक ताणदेखील सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहर परिसरातील जुन्या चाळी, झोपडपट्टीतील नागरिकांसाठी ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची आमची मागणी आहे.
- केदार दिघे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)


..
नवी मुंबईतही आंदोलन
वाशी, (बातमीदार) : शहरी भागातील रहिवाशांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने (ठाकरे गट) नवी मुंबईत मंगळवारी आंदोलन केले. हे आंदोलन आता राज्यभर केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
राज्यात वीज मुबलक असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीयांना ३०० युनिटपर्यंत वीजदेयक माफ करावे, अशी मागणी महावितरणचे कार्यकारी अधिकारी संजय पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, प्रकाश पाटील, संतोष घोसाळकर, सुमित्र कडू, शहरप्रमुख काशिनाथ पवार, महानगरप्रमुख सोमनाथ वासकर, उपजिल्हा संघटक उषा रेणके, आरती शिंदे आदी उपस्थित होते.

..
वाढत्या महागाईत मध्यमवर्गीयांना दिलासा देणे आवश्यक असल्याने ही मागणी करण्यात आली आहे. सरकार शहरी भागातील मध्यमवर्गीय व गोरगरिबांकडे दुर्लक्ष करीत आहे. विजेचे वाढते दर ही चिंतेची बाब असून अशी सेवा निदान मध्यमवर्गीय व गरीब लोकांकडून पैसे कमावण्यासाठी नव्हे, तर सेवाभाव जपण्यासाठी दिली पाहिजे. त्यातच नवी मुंबईत बहुतांश ठिकाणी सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाविषयी ठोस कारवाई करण्याची गरज आहे.
- विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com