विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
Published on

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २ :  पालघर जिल्ह्यातील वाडा परिसरात रस्ते अपघातात एका १४ वर्षीय शालेय मुलीचा मृत्यू झाला होता. तर सात जण जखमी झाले होते. या अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य शासनाच्या नियमावलीचे शहराप्रमाणे ग्रामीण भागात धिंडवडे निघाले आहेत.
राज्य शासनाच्या समितीने अभ्यास करून २०११ मध्ये स्कूल बस नियमावली लागू केली आहे. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी धोकादायक पद्धतीने विद्यार्थी प्रवास करीत असल्याचे वास्तव आहे. या नियमावलीमध्ये विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या रचनेबाबत काटेकोर नियम आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरटीओ, वाहतूक पोलिस यांचा समावेश असलेली परिवहन समिती आहे. तसेच, शालेय पातळीवरही अशा समित्या असून त्यात शालेय प्रशासन, पालक, वाहतूकदार, वाहतूक पोलिस यांचा समावेश आहे. या समित्यांना स्कूल बसची स्थिती तपासणे, थांबे आणि भाडे ठरवण्याचा अधिकारही आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी या नियमावलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे.
---------------------------------
नियमावलीतील प्रमुख तरतुदी
- शाळेच्या  बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा अपघात विमा काढलेला असणे आवश्यक आहे. ही जबाबदारी शाळा प्रशासनाची आहे. शाळा प्रशासन विम्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या शुल्कात समाविष्ट करू शकते. बसमध्ये आवश्यक औषधे आणि साहित्यासह प्रथमोपचार पेटी हवी.
- अग्निशमन यंत्रणाही बंधनकारक आहे.  सीसीटीव्ही तसेच विद्यार्थ्यांच्या नावांची यादी, इयत्ता, पत्ता, रक्तगट आदी तपशील, पालकांचे संपर्क क्रमांक असलेली पुस्तिका असावी.  तसेच, प्रत्येक बस  स्वच्छ, निर्जंतुक केलेली असावी. 
- बसमध्ये प्रवासी संख्येपेक्षा अधिक विद्यार्थी घेऊ नयेत, असा नियम आहे. बसमध्ये वेग नियंत्रक असणे आवश्यक आहे. मुंबई महानगर परिसरात  बसची कमाल वेग मर्यादा ताशी ४० किमी, तर इतर महानगरांमध्ये ताशी ५० किमी अशी निश्चित करण्यात आली आहे.
-----------------------------------------------
कोणत्या नियमांचे उल्लंघन?
मुंबई शहर आणि उपनगरात सर्रासपणे विद्यार्थ्यांची अधिकृत शालेय बसऐवजी खासगी वाहनातून वाहतूक केली जाते. वैध परवाना नसणे, शालेय बसची योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपणे, रिक्षा किंवा टॅक्सीमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ने-आण करणे, असे प्रकार घडत आहेत. तर, दक्षिण मुंबईत चक्क पांढऱ्या नंबरप्लेट असलेल्या वाहनातून, आयुर्मान संपलेल्या वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. 
-----------------------------------------
शाळेची बससेवा परवडत नाही; परंतु त्याचे दर परवडत नसल्याने नाईलाजाने रिक्षा किंवा व्हॅनमधून मुलांना शाळेत सोडावे लागते.
-विजय शिंदे, पालक, चेंबूर 
--------------------------------
पोतदार शाळेची बस दोन वर्षांपूर्वी चार तास गायब झाली होती. त्यामुळे बसमध्येही मुले सुरक्षित आहेत का, असा प्रश्न आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी मुलाला शाळेत  सोडायला जाते. 
-शीतल मुळे, पालक, सांताक्रूझ 
--------------------------------
विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात सर्व नियमांचे पालन स्कूल बसमध्ये करण्यात येते. याउलट स्कूल व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक नियम उल्लंघन केले जाते. मुंबईत दहा हजार खासगी वाहनांतून विद्यार्थी वाहतूक केली जाते; परंतु आरटीओकडून खूप कमी कारवाई केली जाते.
-अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन
-----------------------------
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य शासनाने अत्यंत काटेकोर नियमावली लागू केली आहे; परंतु त्याचे उल्लंघन करत काही वाहनांतून विद्यार्थी वाहतूक केली जात आहे. त्यांच्यावर कारवाईसाठी  लवकरच विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. 
-विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com