‘मद्य मुक्त’ खारघरला सुरूंग

‘मद्य मुक्त’ खारघरला सुरूंग

‘मद्यमुक्त’ खारघरला सुरुंग
जे. जे. रसोई हॉटेलला बार परवाना
खारघर, ता. २ (बातमीदार) : जे. जे. एस. सर्व्हिसेस या आस्थापनेने न्यायालयात धाव घेत खारघर येथे बार परवाना मिळवला आहे. या परवानामुळे ‘दारूमुक्त’ खारघर वसाहतीत बारचा प्रवेश झाल्यामुळे भविष्यात या परिसरात आणखी बार सुरू होऊन मद्य संस्कृती वाढेल, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
खारघर हे दारूमुक्त असावे, यासाठी संघर्ष समिती अनेक वर्षांपासून लढा देत आहे. त्यातच राज्य उत्पादन शुल्क विभागाने येथील दोन हॉटेलला विदेशी दारू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सेक्टर १२ मधील जे. जे. एस. सर्व्हिसेस या हॉटेलमालकाने मागील वर्षी मद्य परवाना मिळावा म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केला होता. त्याविरोधात संघर्ष समिती, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोध दर्शवत रितसर तक्रार दाखल केली होती. त्यातच गेल्यावर्षी २६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणीवेळी या हॉटेलला मद्य परवानगी नाकारली. याविरोधात हॉटेलमालकाने न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायालयाने हॉटेलच्या बाजूने निकाल दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी द्यावी लागली. त्यामुळे जे. जे. रसोई हॉटेलला परवानगी मिळाल्यामुळे इतरही काही हॉटेलमालकांनी जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाकडे बार परवानगीसाठी अर्ज केल्याचे समजते.

..
इतर हॉटेलला दिलेल्या परवानगीनुसारच आम्हाला परवानगी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकाऱ्याने तो नाकारला आहे, मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे रितसर परवाना प्राप्त झाला आहे.
- पवन शिखची, जे. जे. एस. सर्व्हिसेस

सायन-पनवेल महामार्गालगत आणि खारघर वसाहतीत समावेश असलेल्या कोपरा गावात अजित पॅलेस, तर काही अंतरावर असलेल्या निरसूख पॅलेस या हॉटेलमध्ये विदेशी मद्याला परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही दोन्ही हॉटेल सायन-पनवेल महामार्गावर आहेत. दरम्यान, जे. जे. रसोई हॉटेल हे खारघर सेक्टर १२ रस्त्याच्या कडेला आहे. त्यामुळे खारघर वसाहतीत बारचा प्रवेश केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

..
एकजुटीचा अभाव
खारघर शहर मद्यमुक्त शहर असावे आणि बार संस्कृती उदयास येऊ नये, याविरोधात १६ वर्षांपूर्वी खारघरमधील ३५ संस्था, संघटना, राजकीय पक्ष एकत्र येत आंदोलन, मोर्चा काढून प्रखर विरोध केला. यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून लढाही सुरू आहे, मात्र या लढ्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे, तसेच संघर्ष समितीमध्ये एकजूट नसल्यामुळे खारघरमध्ये बार संस्कृती उदयास आल्याचे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com