व्यापाऱ्यांची सडलेला बटाटा गोळा करण्यासाठी झुंबड.

व्यापाऱ्यांची सडलेला बटाटा गोळा करण्यासाठी झुंबड.

सडलेला बटाटा गोळा करण्यासाठी झुंबड

‘एपीएमसी’त ३०० टनहून अधिक बटाटा सडल्‍याची घटना
वाशी, ता. २ (वार्ताहर) : नवी मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या पावसाचा फटका ‘एपीएमसी’मधील कांदा-बटाटा मार्केटला बसल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी याठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या बटाट्यापैकी आठवड्याभरात जवळपास ३०० टन बटाटा सडल्याची बाब समोर आली आहे. हे बटाटे मार्केट परिसरातच फेकले गेल्याने हातगाडीवर बटाटे विकणाऱ्या विक्रेत्यांची हे बटाटे गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच हे बटाटे शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांना विकले जात असल्याने वडापाव गाड्यांवर यापैकीच बटाट्यांचा वापर केला जात असल्याची शंका व्यापाऱ्यांनी उपस्थित केली आहे.

एपीएमसी मार्केटमधील सोईसुविधांवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. मार्केट परिसरामध्ये सडलेला माल हा रस्त्यावर फेकून दिला जातो. सोबतच प्रशासनाकडून येथील कचरा वेळोवेळी उचलला न गेल्यामुळे हा माल तसाच रस्त्यावर पडून सडत राहिल्याचे चित्र दिसून येते. गेल्या आठवड्याभरामध्ये एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये जवळपास बटाटा मालाच्या सहा हजार गोण्या आल्या असून त्यातील जवळपास अडीचशे ते तीनशे टन माल हा पावसाच्या पाण्यामुळे सडला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने कोणतीच हालचाल न केल्यामुळे हा बटाटा सडला असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे मार्केट यार्ड परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून सडलेल्या बटाट्याच्या गोण्यांमुळे डास आणि माशांचा प्रादुर्भाव परिसरात वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यातच हा सडलेला बटाटा गोळा करण्यासाठी हातगाडीवरून बटाटा विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांची झुंबड उडाली. हाच माल पुढे नवी मुंबई, मुंबईच्या परिसरांमध्ये बटाटावड्याच्या गाड्यांवर विक्री केला जात असल्याचा संशय व्यापाऱ्यांनी वर्तवला असून मुंबईकरांची भूक भागवणाऱ्या वडापावमध्ये हाच सडलेला बटाटा वापरला जात असल्याची माहिती एका किरकोळ बटाटा व्यापाऱ्याने दिली.

..
प्रशासनाला गांभीर्य नाही
व्यापाऱ्यांकडून कचरा वेळोवेळी उचलला जात नाही. यासाठी वारंवार एपीएमसी प्रशासनाकडे तक्रार करण्यात येते. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री साफसफाई दाखवून सफाई कंत्राटदारासोबत संगनमत करून मलिदा लाटण्याचे काम करत असल्याचा आरोप कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी केला होता. मात्र, अद्याप प्रशासनाला याबाबतचे गांभीर्य लक्षात आले नसल्याचे तोतलानी म्हणाले. हा व्यापारी, माथाडी कामगार आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचेही तोतलानी यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com