पावसामुळे भिवंडीत खड्डेच-खड्डे

पावसामुळे भिवंडीत खड्डेच-खड्डे

Published on

भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जवळजवळ सर्वच छोटे-मोठे रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे वाहने उलटून अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. रस्ता वाहून गेल्याने आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. या खड्ड्यांमुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाचा कारभार उघडा पडला आहे. दरम्यान, शहरात विविध समस्या डोके वर काढत असताना माजी लोकप्रतिनिधी मात्र गप्प बसले असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडीतील सर्वच रस्त्यांवर दोन फूट लांबीचे, रुंद आणि खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार घसरून जखमी होत आहेत. शहरात दररोज अनेक वाहने उलटून अपघात होत आहेत. एवढेच नाही, तर खड्डेमय रस्त्यांमुळे संपूर्ण शहरात वाहतूक कोंडीही वाढली आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची हीच स्थिती असते. रस्त्यांच्या दुरवस्थेला महापालिकेचे काही अधिकारी आणि निकृष्ट काम करणारे कंत्राटदार कारणीभूत आहेत. हे सगळे रस्ते बांधणीत भ्रष्ट कारभार करण्यात व्यग्र आहेत, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विद्यार्थी, नोकरदारांना लेटमार्क
पावसाच्या पाण्याने भरलेल्या रस्त्यांमुळे वाहने कासवगतीने जात आहेत. त्यामुळे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी ४० मिनिटे लागत आहेत. शाळेत जाणारे विद्यार्थी आणि नोकरदारवर्ग वेळेवर आपल्या ठिकाणी पोहचत नसल्याने त्यांना लेटमार्क लागत आहे.

पावसामुळे रस्त्यांचे डांबरीकरण करता येत नाही. या कालावधीत डांबरी कंपन्याही बंद असतात. सध्या रस्त्यांवरील खड्डे माती, दगड टाकून बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे जनतेला काही प्रमाणात खड्ड्यांपासून दिलासा मिळणार आहे. रस्तेदुरुस्तीच्या निविदा खुल्या झाल्या असून, आचारसंहिता संपल्यानंतर रस्ते बनवण्याचे काम सुरू होईल.
- सचिन नाईक, प्रभारी शहर अभियंता,
बांधकाम विभाग, भिवंडी महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.