कल्याण पूर्व हत्या प्रकरण

कल्याण पूर्व हत्या प्रकरण

Published on

कल्याण पूर्व हत्या प्रकरण
कल्याण गुन्हे शाखेने दोघांना नाशिकहून केली अटक
तिघांचा शोध अद्याप सुरू
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : कल्याण पूर्व येथे सोमवारी (ता. १) सायंकाळी संदिप राठोड (वय २६) याची भररस्त्यात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण गुन्हे शाखा याचा समांतर तपास करत असताना यातील आरोपी इगतपुरी रेल्वे स्थानकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने नाशिक येथे सापळा रचून शैफ उर्फ साहिल नसीर शेख (वय २१) व विद्यासागर तुलसीधरण मुर्तील उर्फ अण्णा (वय २१) यांना अटक केली, तर यातील तिघांचा शोध सुरू आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हाजीमलंग रोडलगत सोमवारी सायंकाळी पाच जणांनी धारदार शस्त्राने वार करत एका तरुणाची हत्या केली होती. संदिप राठोड असे मृत तरुणाचे नाव असून भररस्त्यात संदिपच्या डोके, खांदे, पोट व पाठीवर चॉपरने वार करत त्याची हत्या केली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात प्रेम चव्हाण याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. कल्याण गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण, संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, रमाकांत पाटील, अनुप कामत, विलास कडु, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग यांचे पथक काम करत होते. हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती, तसेच गुप्त बातमीदारांकडून त्यांची माहिती गोळा केली. यावेळी यातील संशयित आरोपी हे इगतपुरी रेल्वे स्थानक येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी येण्याआधीच तेथे सापळा रचला. यात शैफ व अण्णा या दोघांना ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.