कचऱ्यासाठी एक पाऊल पुढे

कचऱ्यासाठी एक पाऊल पुढे

Published on

कचऱ्यासाठी एक पाऊल पुढे
ठाणे पालिका पारंपरिक प्रथा बंद करणार; जीपीएस यंत्रणा ठेवणार देखरेख
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ठाणे महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या तीव्र बनत चालली आहे. ही कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. त्यानुसार आता पालिकेने कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, व्यावसायिक कचरा, नॉनव्हेज कचरा गोळा करण्यासाठी तीन पद्धतींच्या वाहनांचा अवलंब केला आहे. यामुळे पारंपरिक प्रथा बंद होऊन कचऱ्याची योग्य पद्धतीने वाहतूक व नियोजन केले जात आहे.
ठाणे पालिका हद्दीतील कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी डायघर येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला. झोपडपट्टी भागात कचऱ्याची गाडी वेळेत आली नाही तर ती समस्या तीव्र बनते. मध्यंतरी कचरा गोळा करण्याची जबाबदारी महिला बचत गटांना देण्यात आली होती; परंतु ही संकल्पना फारशी यशस्वी झाली नाही. त्यामुळे आता ९० छोट्या टेम्पोंच्या माध्यमातून येथील कचरा गोळा केला जाणार आहे. प्रत्येक प्रभाग समितीला दहा टेम्पो दिले जाणार आहेत.

परिसराचे वर्गीकरण
माजिवडा मानपाडा, वर्तक नगर, वागळे आणि लोकमान्य सावरकर नगर हा पहिला भाग आणि कोपरी, दिवा, कळवा आणि उथळसर हा दुसरा भाग या पद्धतीने वर्गीकरण केले जाणार आहे.

टप्पा दुसरा
दुसऱ्या टप्प्यात व्यावसायिक कचरा गोळा करण्यासाठी मोठे वाहन उपलब्ध करून दिले जाणार असून त्यात केवळ व्यावसायिक कचरा गोळा केला जाणार आहे. गृहसंकुलांच्या ठिकाणीही ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच नॉनव्हेज कचरा गोळा करण्यासाठी वेगळी वाहन व्यवस्था असणार आहे. याशिवाय स्वीपिंगसाठीदेखील वेगळ्या गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
......................
कामानुसार दिले जाणार पैसे
कचऱ्याची वाहतूक करताना पर टनामागे ठेकेदाराला पैसे दिले जात होते; परंतु आता नव्या धोरणानुसार ठेकेदाराकडून किती कचरा उचलला गेला, त्याने योग्य प्रकारे वाहतूक केली का? यासाठी जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यानंतर ५० टक्के रक्कम त्याला महिनाकाठी दिली जाणार आहे. कामावर किती कर्मचारी होते, गाड्यांची वाहतूक योग्य पद्धतीने झाली का? त्यानुसार पुढील रक्कम दिली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.