पालिकेचा अग्निसुरक्षेवर वॉच

पालिकेचा अग्निसुरक्षेवर वॉच

पालिकेचा अग्निसुरक्षेवर वॉच
१,२७० इमारतींची तपासणी; २७८ इमारतींमध्ये त्रुटी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः मुंबईत अग्निसुरक्षेवर भर देण्यात येत असून वर्षभरात एक हजार २७० इमारतींची तपासणी करण्यात आली. त्यातील २७८ इमारतींमध्ये त्रुटी आढळल्या; मात्र अग्निशमन दलाकडून नोटिसा बजावल्यानंतर त्याची पूर्तता केल्याचे अग्निशमन दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.    
मुंबईतील इमारतींमधील आगींच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत भाई जगताप, डॉ. प्रज्ञा सातव, राजहंस सिंह आदींनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न विचारला होता. आगीच्या किती घटना घडल्या आहेत, किती इमारतींच्या अग्निसुरक्षेची तपासणी केली आहे, किती जखमी किंवा मयत झाले आहेत, वीज व पाणी कापण्याची कारवाई करण्यात आली आहे का, असे प्रश्न विचारण्यात आले होते.
सरकारने उत्तर देताना म्हटले आहे की, जानेवारी महिन्यात २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत महापालिकेमार्फत एकूण एक हजार २७० इमारतींची अग्निसुरक्षाविषयक तपासणी करण्यात आली. सदर तपासणीमध्ये २७८ इमारतींमधील आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्या. या त्रुटींची विहित कालावधीत पूर्तता करण्यासाठी संबंधितांना महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. महानगरपालिकेच्या अहवालानुसार संबंधित सर्व भोगवटादारांनी २७८ इमारतींत विहित कालावधीत त्रुटींची पूर्तता केली आहे, असेही पुढे म्हटले आहे.

नियमांची कडक अंमलबजावणी
महानगरपालिका क्षेत्रातील ७० मीटरपेक्षा उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे व नियमावली जारी करण्यात आल्या आहेत. सदर मार्गदर्शक तत्त्वे व नियमावलीनुसार महानगरपालिका क्षेत्रातील ७० मीटरपेक्षा उंच इमारतींच्या बांधकामासाठीच्या प्रस्तावांना ‘तात्पुरती आग संरक्षक मान्यता’ देतेवेळी सदर इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. याची कडक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com