अवैधरित्या शस्त्रसाठा विकणारा दलाल गजाआड

अवैधरित्या शस्त्रसाठा विकणारा दलाल गजाआड

Published on

अवैधरित्या शस्त्रसाठा विकणारा दलाल गजाआड
मुंबई गुन्हे शाखेकडून आठ पिस्टल आणि १३८ जिवंत काडतुसे जप्त

मुंबई, ता. ३ : मुंबईसह महाराष्ट्रात अवैधरित्या शस्त्र विक्री करणाऱ्या मिर्झापूरच्या दलालास मुंबई गुन्हे शाखेने रविवारी बेड्या ठोकल्या. त्याच्यामार्फत शस्त्र विकणाऱ्या, खरेदी करणाऱ्या नवी मुंबईतील दोन व्यक्तींनाही गेल्या दोन दिवसांत अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण आठ पिस्टल आणि १३८ जिवंत काडतुसे इतका शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
मिठाईलाल चौधरी असे आरोपीचे नाव असून तो देशभरात हरीओम या नावे ओळखला जात होता. चौधरी याने गेल्या २५ वर्षांत अनेक व्यक्ती, संस्थांना अवैधरित्या शस्त्र विक्री केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या सर्व व्यक्ती, संस्था रडारवर असल्याची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा जप्त केला जाईल, असा अंदाज गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात आला. गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चौधरीसह दावल देवरमनी उर्फ धवल आणि पुष्पक मडवी यांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. चौधरी आणि धवल यांनी मडवी याला शस्त्रे विकली होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आली आहे.


एक काडतूस म्हणजे एक हत्या
एक काडतूस म्हणजे एक हत्या, हे पोलिसांचे सूत्र असल्याने गुन्हे शाखेची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. आरोपी मिठाईलाल चौधरी मूळचा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरचा रहिवासी असून तो त्याच भागातून ऑर्डरप्रमाणे शस्त्र, काडतुसे बनवून घेतो, अशी माहिती तपासातून पुढे आल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या कारवाईत हस्तगत झालेली शस्त्रे आधुनिक असल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.