नौदल अधिकाऱ्यांकडून अन्य देशातही मानवी तस्करी?

नौदल अधिकाऱ्यांकडून अन्य देशातही मानवी तस्करी?

नौदल अधिकाऱ्यांकडून अन्य देशांतही मानवी तस्करी?
विविध देशांच्या दूतावासांशी गुन्हे शाखेचा संपर्क

मुंबई ः अटकेत असलेले नौदल अधिकारी दक्षिण कोरियाच नव्हे, तर अन्य देशांमध्येही मानवी तस्करी करत होते, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आली आहे. खातरजमा करण्यासाठी गुन्हे शाखेने अन्य देशांच्या दूतावासांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.

गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने अलीकडेच डागर, ज्योती या नौदल अधिकाऱ्यांसह सिमरन तेजी आणि दीपक डोगरा, रवी कुमार या काश्मिरी तरुणांना अटक केली. ही टोळी द. कोरियात मजूर म्हणून जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांना बनावट कागदपत्रांद्वरे टुरिस्ट व्हिसा मिळवून देत असे. या व्हिसाद्वारे हे तरुण द. कोरियात उतरले आणि तेथील आश्रमशाळेत त्यांची रवानगी झाली की ही टोळी त्यांच्या कुटुंबीयांकडून सुमारे १० लाख रुपये घेत असे.

नौदलात डागरपेक्षा कनिष्ठ पदावर नियुक्त ज्योती हा या टोळीचा सूत्रधार होता. द. कोरियात मानवी तस्करी करण्याची कल्पना त्याच्याच मेंदूतून निघाली होती. ज्योती, डोगरा कोरियात जाण्यासाठी इच्छुक तरुण हेरत. बनावट कागदपत्रे तयार करून घेत. त्याआधारे व्हिसा मिळवून देण्याची जबाबदारी डागर सांभाळे; तर ज्योतीची प्रेयसी सिमरन टोळीचे आर्थिक व्यवहार बघे. या चौघांसोबत अटक झालेला रवी प्रत्यक्षात बळीत असून या टोळीच्या मदतीने तो द. कोरियात जाण्याच्या बेतात होता. त्याच्याच व्हिसावरून डागर याने कोरियन दूतावासात घातलेल्या गोंधळामुळे या टोळीचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणाचा तपास करताना डागर याने द. कोरियाप्रमाणे अन्य काही देशांच्या दूतावासाला व्हिसासाठी भेटी दिल्याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे.

बॉक्स

नौदलानेच केली चौकशीची मागणी
-- कोरियन दूतावास रवीचा व्हिसा अर्ज हाताळत होते. मूळचा काश्मिरी असून पेशाने दातांचा डॉक्टर आहे. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात दवाखाना आहे, अशी माहिती त्याच्या अर्जात नमूद होती. मात्र प्रत्येक वेळेस रवीऐवजी डागर नौदल गणवेशात दूतावासात हजर होत होता. त्यामुळे दूतावास सतर्क झाला आणि रवीबाबत चौकशी झाली. नाशिकच्या पत्त्यावर दवाखाना नव्हता. अर्जातील संपर्क क्रमांकही डागरचा आढळताच दूतावासाने त्याचा अर्ज फेटाळला. तेव्हा डागरने ईमेलद्वारे दूतावासावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. हा ईमेल मिळताच दूतावासाने नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. डागर याचा ईमेल, अन्य व्यक्तीच्या (रवी) व्हिसासाठी फेऱ्या, त्याचे सीसीटीव्ही चित्रण आदी माहिती दिली. त्यावरून नौदलानेच मुंबई पोलिसांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

अशी झाली मानवी तस्करीला सुरुवात
नौदल अधिकारी ब्रह्म ज्योती आणि दीपक डोगारा हे वर्गमित्र आहेत. डोगरा सुमारे साडेतीन वर्षे द. कोरियात मजुरी करून भारतात परतला होता. तेथे मजुरांना महिन्याकाठी लाखांच्या घरात पगार मिळतो, मजुरांना मिळणाऱ्या सुखसोयी, सुरक्षा आणि परदेशी मजुरांना असलेली वाढती मागणी, याबाबत त्याला इत्यंभूत माहिती होती. ती त्याने ज्योतीला दिली. भारतातून दक्षिण कोरियासाठी वर्क व्हिसा मिळत नाही, हे माहीत असल्याने या दोघांनी टुरिस्ट व्हिसावर तरुणांना तेथे पाठवण्याचा कट आखला. पर्यटक म्हणून तिथे जायचे आणि भारतात परतण्यास नकार द्यायचा. असे केल्यास कोरियन यंत्रणा आश्रमशाळेत पाठवते. ओळखपत्रासोबत हाताला कामही देतात, याची कल्पना असल्याने या दोघांनी बनावट कागदपत्रे तयार करून तरुणांना तेथे पाठवण्यास सुरुवात केली. व्हिसा मिळवण्यात अडचण येऊ नये, या दृष्टीने त्यांनी डागर याला सोबत घेतले.

अंतर्गत सुरक्षेला धोका
द. कोरियात सर्वाधिक मजूर पाकिस्तानचे आहेत. शिवाय ब्रह्म, डोगरा यांचे गाव पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे. त्यामुळे भारतातून बनावट कागदपत्रांद्वारे कोरियात गेलेल्या व्यक्तीने तेथे दहशतवादी कृती केल्यास देशाची बदनामी होऊ शकेल किंवा तेथील पाकिस्तानी व्यक्तींद्वारे माठे भडकून भारतात परतलेल्या एखाद्या व्यक्तीकडून देशात दहशतवादी कृत्य घडू शकेल, या अंदाजावरून या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com