ठाणेकरांना वाढीव पाण्याची प्रतीक्षा

ठाणेकरांना वाढीव पाण्याची प्रतीक्षा

सकळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : ठाणे शहराची दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या आणि होणाऱ्या नागरिकरणामुळे पाणी टंचाईची समस्या उद्भवू लागली आहे. भविष्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सूर्या, बारवी, एमआयडीसी, देहरज आणि स्टेमला वाढीव पाण्यासाठी महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे. परंतु मागील दहा महिन्यांपासून या संदर्भात बैठकच लावण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे वाढीव पाणी मिळावे, यासाठी पालिकेने मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिवांना स्मरणपत्र देत बैठक लावण्याची विनंती केली आहे.
ठाणे पालिका क्षेत्रात दररोज ४८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा कमी पडतो. हे लक्षात घेऊन बारवी आणि भातसा धरणांतून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर या धरणातून शहराला १०० दशलक्ष लिटर पाणी मिळावे, असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला होता. त्यात २०५५पर्यंत भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता साधारणत: १११६ द.ल.लि प्रती दिन एवढा पाणीपुरवठा अपेक्षित आहे. त्यानुसार महापालिकेस नियोजन करणे अपेक्षित आहे. भविष्यात होऊ घातलेल्या काळू धरणातून ४०० द.ल.लि प्रती दिन एवढा पाणीसाठा पालिकेला उपलब्ध होणे अत्यावश्यक असल्याने त्याला मान्यता मिळण्याचा प्रस्ताव आयुक्त एमएमआरडीए आणि प्रधानसचिव, जलसंपदा विभागांना पाठवण्यात आला आहे. शिवाय, भविष्यात प्रस्तावित असलेल्या मुमरी धरणातूनही १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मिळावा, यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही या विभागांकडून बैठक लावण्यात येत नसल्याने ठाणेकरांना पाणी केव्हा मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

निवडणुकांपूर्वी बैठकीचे साकडे
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने यासंदर्भात १८ जूनला अपर मुख्य सचिवांना बैठक लावण्यासंदर्भात स्मरणपत्र धाडले आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत पुन्हा विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू होणार आहे. आधी लोकसभा निवडणुकीमुळे ही बैठक होऊ शकली नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणुका लागण्याआधी ही बैठक व्हावी यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com