सीमावर्ती भागातील तपास चौक्या बंद करा

सीमावर्ती भागातील तपास चौक्या बंद करा

सीमावर्ती भागातील तपास चौक्या बंद करा

राज्यातील अवजड वाहनचालकांची राज्य सरकारकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ : राज्याच्या सीमावर्ती भागात असणाऱ्या तपासणी चौक्या इतर राज्यांच्या धर्तीवर बंद करा, अन्यायकारी ई-चलन आकारू नका, अशा विविध मागण्या राज्यातील अवजड वाहनचालकांनी सरकारकडे केल्या. नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांचा ७५ वा वर्धापन दिन साजरा झाला. याप्रसंगी आयोजित सभेत संघटनेतर्फे राज्य सरकारकडे या व इतर मागण्या करण्यात आल्या.

बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी व्हर्च्युअल पद्धतीने हजेरी लावत पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच या सभेदरम्यान जे प्रस्ताव मंजूर झाले आहेत, वाहनचालक आणि माल वाहतूकदारांनी सभेत ज्या समस्या मांडल्या, या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार वाहतूकदारांसोबत आहे, तसेच आगामी काळात लवकरच त्यांच्या सर्व मागण्या मंजूर होतील, असे आश्वासनही गोयल यांनी दिले. या कार्यक्रमाला देशभरातील विविध कानाकोपऱ्यातून दीड हजारपेक्षा जास्त वाहतूकदार कंपन्यांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी माजी मंत्री पाशा पटेल, आमदार सतेज पाटील, सनदी अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह जीएसटी आयुक्त जयंत पाटील, अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश खोसला, आयोजन समितीचे अध्यक्ष बाल मलकित सिंग, संयोजक अशोक गोयल, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदान, एआयएमटीसी अध्यक्ष डॉ. जीआर शान्मुगप्पा आदी मान्यवर उपस्थित होते.

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांनी त्यांच्या सीमावर्ती भागातील चौक्या बंद केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही त्या धर्तीवर चौक्या बंद कराव्या, अशी प्रामुख्याने मागणी बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली. सध्या देशभरात २२ टक्क्यांपेक्षा जास्त कुशल अवजड वाहनचालकांचा तुटवडा आहे. हा तुडवडा भरून काढण्यासाठी जुने नियम बदलण्याची मागणीही करण्यात आली. वाहन निर्मितीमधील तंत्रज्ञान आता पूर्वीपेक्षा अधिक विकसित झाले आहे. त्यामुळे वाहनचालकाला क्लिनरची गरज लागत नाही, परंतु क्लिनर नसल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. चुकीच्या पद्धतीने चालकांवर ई-चलन काढले जाते. अशा कारवाया तत्काळ थांबवाव्यात. या कारवायांमुळे वाहतूकदारांना नाहक भुर्दंड बसत असल्याचे वाहतूकदारांनी सांगितले.

मानखुर्द, मुलुंड आणि दहिसर हे मुंबईतील सुरक्षित ट्रक टर्मिनल/पार्किंग झोन आहेत. मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रवेशाच्या ठिकाणी वाहतूकदारांकरिता सुविधा निर्माण कराव्यात. महामार्गावरील मूलभूत सुविधा, व्यावसायिकांसाठी सुरक्षित टर्मिनल/पार्किंग झोन विकसित करावे. वडाळा ट्रक टर्मिनल पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी परवानगी देणे, तसेच काही वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून वाहतूकदारांना २०१६-१७ ला कारवाईच्या नोटिसा जारी केल्या आहेत. या नोटिसा रद्द कराव्यात, आदी मागण्या एका सादरीकरणाद्वारे मांडण्यात आल्या.

..
वाहतूकदारांकडून नाराजी व्यक्त
बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर अभ्यास करून मार्ग काढण्यासाठी राज्याच्या सचिवांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करावी, अशी मागणी काही वर्षांपूर्वी करण्या आली असून अद्याप ती मंजूर न झाल्याने वाहतूकदारांनी नाराजी व्यक्त केली.


...
आठ वर्षांपेक्षा जास्त जुन्या ट्रकवर मुंबईत बंदी
मुंबई उच्च न्यायालयाच्या १९९०च्या आदेशावर महाराष्ट्र सरकारकडून आठ वर्षांपेक्षा जास्त जुन्या ट्रकवर मुंबईत बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावर पुनर्विलोकन करण्याची विनंती वाहतूकदारांनी केली. सध्या विकसित युग आहे, तंत्रज्ञान आणि उत्सर्जन नियंत्रणात लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळे ट्रकसारख्या अवजड वाहनांमधून प्रदूषण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. एचसीव्ही वाहनांसाठी क्लिनरच्या आवश्यकतेबाबत नियम २४९ ‘एमएमव्हीआर’ अंतर्गत दुरुस्ती करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com