हिरवळीच्या खतातून समृद्धीकडे...

हिरवळीच्या खतातून समृद्धीकडे...

सुनील कोकरे, वाणगाव
उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात शेतकरी दिवसेंदिवस रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्याचा परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी चिखलणीच्या वेळेला जमिनीमध्ये गिरीपुष्प यांसारख्या हिरवळीच्या वनस्पतींचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे कृषी अधिकारी सांगतात.

वनस्पतीचे हिरवे अवशेष जमिनीत वाढवून किंवा बाहेरून आणून जमिनीत गाडणे किंवा वनस्पतींच्या हिरव्या अवशेषावरून तयार झालेले खत होय. पिकांच्या वाढीसाठी, तसेच जमिनीच्या सुपिकतेसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध व्हावेत, म्हणून जमिनीत विशिष्ट वनस्पतींचा हिरवा पाला गाडलेला असतो. हा पाला जमिनीत गाडल्यानंतर तो कुजतो आणि त्यातील उपलब्ध अन्नद्रव्ये मातीत मिसळतात. जमिनीमध्ये जैवपदार्थांची भर करण्यासाठी या प्रकारच्या खताचा उपयोग करतात. जमिनीत लवकर तयार होणारी पिके लावून ती ठराविक वेळी नांगराने जमिनीत गाडून टाकतात, यालाच हिरवे खत म्हणतात. हे खत स्वस्त असून त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते.

हिरवळीच्या वनस्पती :
हिरवळीचे खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने धैंचा, बोरू, शेवरी, बरसीम, सुबाभूळ, गिरीपुष्प, चवळी, मूग आदी हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते.

हिरवळीच्या खतांची कार्यशक्ती
सर्वसाधारणपणे एक टन हिरवळीचे किंवा शेंगवर्गीय पिकापासून बनलेले खत हे २.८ ते तीन टन शेणखत किंवा ४.५ ते ४.७ किलो नत्र किंवा १० किलो युरियाच्या बरोबर असते. म्हणजेच २४ ते ३० किलो नत्राचा पुरवठा करण्यासाठी सहा टन हिरवळीचे खत प्रति हेक्टरी वापरावे लागते.

हिरवळीच्या खतांचे गुणधर्म
- प्रति हेक्टर सुमारे ५० ते १७५ किलो नत्र उपलब्ध होते.
- जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो.
- मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते. उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते.
- जमिनीची भौतिक स्थिती सुधारते. अन्य मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते.

हिरवळीच्या खतांचे फायदे
- हिरवळीच्या खतांमध्ये ह्युमस नावाचे सेंद्रिय द्रव्य असते. त्यामुळे मातीला काळा रंग येतो.
- या सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी, जिवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते.
- लवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण आणि अझोटोबॅक्टरसारख्या जीवाणूंचे प्रमाण वाढते.
- जमिनीत टिकून राहणाऱ्या कणसमूहांचे प्रमाण वाढते.
- जमिनीची जलधारणा क्षमता वाढते. पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूपही कमी होते.
- सेंद्रिय पदार्थांमुळे माती रवेदार होण्यास मदत होते.
- द्विदल वर्गातील हिरवळीची पिके ही हवेतील नत्र शोषून घेतात. हे नत्र जमिनीत साठविले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.
- क्षारपड जमिनीत हिरवळीचे पीक गाडण्यामुळे क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली येतात.
- हिरवळीची पिके ही जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फुरदात रूपांतर करतात. जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.
- हिरवळीच्या पिकात हेक्टरी २० ते २५ किलो नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया जोमाने होते.

आंतरपीक म्हणूनही वापर
हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणूनदेखील घेता येते. उदा. फळबागेत ताग, धैंचा, बरसीम, चवळी ही हिरवळीची पिके आंतरपीक म्हणून पेरून सहा ते आठ आठवड्यांनी जमिनीत गाडून टाकावीत. हिरव्या पानांचा वापर करावयाचा असल्यास या पिकांची बांधावर किंवा पडीक जमिनीत लागवड करावी. हिरवी कोवळी पाने गोळा करून ती पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळावीत.

कोकण कृषी विद्यापीठाने चारसूत्री भातलागवडीच्या बाबतीत चिखलणीच्या वेळेला गिरीपुष्प या हिरवळीच्या वनस्पतीचा अवलंब करावा, अशी शिफारस आहे. दिवसेंदिवस जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी भातलागवडीच्या वेळी सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आणि पाण्याची जलधरण क्षमता वाढविण्यासाठी चिखलणीच्या वेळेला भातखाचरात गिरीपुष्प, ताग, धैंचा अशा हिरवळीच्या वनस्पतींच्या पाल्याचा अवलंब करावा, जेणेकरून जमिनीचे आरोग्य टिकून राहील, तसेच जमिनीला नत्राचा पुरवठादेखील होऊ शकेल.
- विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com