वायकरांविरोधतील तपास बंद करण्याची परवानगी द्या

वायकरांविरोधतील तपास बंद करण्याची परवानगी द्या

वायकरांविरोधात तपास बंद
करण्याची परवानगी द्या
आर्थिक गुन्हे शाखेचा न्यायालयात सी समरी अहवाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : खासदार रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी आणि व्यावसायिक भागीदारांविरोधातील तक्रार सिद्ध करता येत नाही आणि नाकारताही येत नाही, असे ‘सी समरी’ अहवालात नमूद करून आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास बंद करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली.

क्रीडा व मनोरंजनासह सार्वजनिक वापरासाठी आरक्षित केलेला जोगेश्‍वरी येथील भूखंड लाटून त्याजागी पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घातल्याबद्दल वायकर, त्यांची पत्नी आणि व्‍यावसायिक भागीदारांविरोधात गुन्हा नोंद झाला होता. महापालिका यात तक्रारदार होती. दोन्ही बाजूंचे जाबजबाब, पालिकेने पुरवलेली कागदपत्रे तपासल्यानंतर ही तक्रार प्रशासकीय स्वरूपाची असून यात गुन्हा घडल्याचे निदर्शनास येत नाही. शिवाय, आरोपींना आर्थिक नफा झाल्याचेही आढळत नाही, असे निरीक्षण नोंदवून सी समरी अहवाल न्यायालयात सादर केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, हा अहवाल न्यायालयावर बंधनकारक नाही. तपासात समोर आलेले पुरावे, तपशील लक्षात घेता न्यायालय हा अहवाल फेटाळून लावू शकते. तसेच, पोलिसांना हा अहवाल देण्यामागील नेमके कारण न्यायालयाला पटवून द्यावे लागणार आहे. न्यायालय तक्रारदार महापालिकेलाही आपली बाजू मांडण्याची संधी देऊ शकते. त्यामुळे वायकर यांच्यावर या प्रकरणाची टांगती तलवार कायम राहणार आहे.
----
काय आहे प्रकरण?
२००४ मध्ये भूखंड मालक, रवींद्र वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आणि महापालिका यांच्यात करार झाला. त्यानुसार मोकळ्या भूखंडावरील ६७ टक्के जागा सार्वजनिक सुविधा तर उर्वरित भूखंडाचा वापर डीसी नियमांप्रमाणे क्रीडा आणि मनोरंजनासाठी केला जाईल, असे ठरले होते. मात्र, वायकर आणि त्यांच्या भागीदारांनी २०२१मध्ये या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी मिळवली. तेव्हा वायकर शिवसेनेचे आमदार होते. तसेच, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जात. त्यामुळे वायकर यांनी राजकीय वजन वापरून सार्वजनिक उपक्रमांसाठी राखीव असलेला भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी किंवा व्‍यावसायिक वापरासाठी लाटल्याचा आरोप करण्यात आला. गेल्या वर्षी पालिकेच्या वतीने उपअभियंत्याने आझाद मैदान पोलिस ठाण्यात तशी तक्रार दिली. तेथे गुन्हा नोंद झाला आणि तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
-----
तपास बंद करण्याची मागणी चर्चेचा विषय
लोकसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेने हॉटेलसाठी दिलेली परवानगीही रद्द केली होती. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) स्वतंत्रपणे तपास सुरू करून वायकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे घातले. त्यांची चौकशीही केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी वायकर उद्धव ठाकरे गट सोडून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. या गटातर्फे त्यांनी निवडणूक लढवली. अगदी किरकोळ फरकाने त्यांनी ही लढत जिंकली. या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेचा तपास बंद करण्याची मागणी चर्चेचा विषय झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com