ठाणेकरांची कोंडी

ठाणेकरांची कोंडी

ठाणेकरांची कोंडी
घोडबंदरचा प्रवास ‘लांबला’; इंधन, वेळ दोन्ही वाया

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : रस्त्यात बंद पडणारी अवजड वाहने, राज्य महामार्गावरील खड्डे, तसेच मेट्रो व उड्डाणपुलांच्या दुरुस्तीच्या कामांमुळे घोडबंदर मार्गासह सर्वच प्रमुख मार्ग काही दिवसांपासून कोंडीत सापडले आहे. अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या अंतरासाठीही अर्धा ते एक तास कोंडीत वाहने अडकत असल्याने एकवेळ बदलापूरपर्यंतचा लोकल प्रवास बरा; पण घोडबंदरमार्गे जाणारा प्रवास नको, अशी अवस्था ठाणेकरांची झाली आहे. या प्रवासात वेळ तर वाया जातच आहे. त्याचबरोबर महागडे इंधनही खर्ची पडत असल्याने खिशाला कात्री लागत असल्याचा नाराजीचा सूरही उमटू लागला आहे. नोकरदार, व्यावसायिकांना या कोंडीचा रोजच सामना करावा लागत आहे; पण आता कोंडीमुळे शाळेतील बसही अडकून पडत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसत आहे.

मुंबईला खेटून असलेल्या ठाणे शहरातून आणि जिल्ह्यातून घोडबंदर, मुंबई-नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, ठाणे-बेलापूर, मुंबई-आग्रा रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग जातात. तसेच, अंतर्गत मार्गांचे जाळेही मोठे आहे. त्यामुळे एका मार्गावर कोंडी झाली की त्याचा परिणाम इतर मार्गावर होतो. यामध्ये सध्या घोडबंदर मार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग कळीचा मुद्दा ठरत आहेत. घोडबंदर मार्गावर मेट्रोची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावल्याने रस्ता अरुंद ठरत आहेत. त्यात या मार्गाला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. ठाणे महापालिकेने ठाणे शहर खड्डेमुक्त केले असले तरी जे रस्ते त्यांच्या अधिकार कक्षाच्या बाहेर आहेत, तेथे मोठमोठे खड्डे पडले आहे. वाहतूक विभाग आणि पालिकेच्या वारंवारच्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक विभाग, एमएमआरडीएने काही ठिकाणचे खड्डे बुजवले; पण एका आठवड्यातच ते उखडल्याने परिस्थिती गंभीर आहे. याचा सर्वाधिक फटका पावसादरम्यान बसत आहे.

काही ठिकाणी हा मार्ग सखल असल्याने थोड्याशा पावसातही रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. खड्डे चुकवत चालकाला कसरत करावी लागते. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावतो व कोंडी होते. याशिवाय मेट्रोच्या कामामुळेही बारमाही या मार्गावर कोंडीचा सामना करावा लागतो. एकीकडे मेट्रोचे काम सुरू असताना मार्गावरील दोन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई-ठाणे आणि ठाणे-मुंबई या दोन्ही मार्गांवर एकच मार्गिका सुरू असून बॉटेल नेक तयार झाले आहे. या अरुंद मार्गावर एखादे वाहन बंद पडले तर दिवसभर कोंडीचा कसा फटका बसतो हे शुक्रवारच्या (ता. ५) घटनेने सिद्ध झाले आहे. दुसरीकडे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सेवा रस्त्यावर अवजड वाहनांना मुभा देण्यात आली आहे. त्याचा उलट परिणाम आता दिसू लागला आहे. गर्दीच्या वेळी अवजड वाहने मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्यांकडे वळतानाही कोंडी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

कोंडीची प्रमुख कारणे
- ठाणे जिल्ह्यात पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर आणि जुना आग्रा रोड मार्गावरील भिवंडी भागात मेट्रोची कामे सुरू आहेत.
- मुंबई-नाशिक महामार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दुरुस्ती आणि रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत.
- शिळफाटा येथे नाल्यामधील पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग रोखल्याने पावसाळ्यात शिळफाट्यातील रस्त्यावर पाणी साचत आहे.
- प्रवेशबंदी असताना ठाण्यात अवजड वाहनांचा प्रवेश होऊ लागला आहे. ही वाहने भर रस्त्यात बंद पडल्याने कोंडीत भर पडते.

अंतर्गत वाहतुकीचाही खोळंबा
मुंबईहून परतणारा नोकरदार वर्ग पूर्व द्रुतगती महामार्गे कोपरी रेल्वे पुलावरून ठाणे शहरात प्रवेश करतो; परंतु या मार्गावरही कोपरी पूल ते कॅडबरी जंक्शनपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे नोकरदारांना कोपरी ते कॅडबरी जंक्शन असा प्रवास करण्यासाठी किमान पाऊण तास लागतो. हे अंतर कोंडी नसल्यास अवघे १५ मिनिटांचे आहे. त्यातच या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्थाही अत्यंत वाईट झाली आहे. या रस्त्यांवरदेखील वाहतूक कोंडी होत असून नागरिक हैराण झाले आहेत.

कर्जत, कसारा परवडले
ठाणे ते कर्जत-कसारा या मार्गावर लोकल प्रवासासाठी प्रवाशांना किमान दीड ते दोन तास लागतात. तर ठाणे ते कासारवडवली हे अंतर गाठण्यासाठीदेखील प्रवाशांना किमान दीड ते दोन तास लागत आहे. आनंदनगर चेकनाका ते मानपाडा मार्ग गाठण्यासाठी जितका वेळ सध्या कोंडीमुळे लागत आहे, तितक्या वेळेत प्रवासी लोकलने बदलापूर गाठेल, अशी चेष्टाही आता होऊ लागली आहे.

घोडबंदरसह ठाणे शहरात अनेक ठिकाणी रस्ते, पूल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्याचा फटका वाहतुकीवर होत आहे. सुदैवाने गायमुख रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने कोंडीतून दिलासा मिळाला आहे; पण घोडबंदर विशेषता माजिवडा, मानपाडा, कासारवडवली भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस नेहमी तत्पर असतात. त्यातही जर एखादा अपघात होऊन कोंडी झाली तर वेळ न घालवता अपघातग्रस्त वाहन हटवण्यापासून ते वाहतुकीला रस्ता करून देण्याची कामे वाहतूक विभाग युद्धपातळीवर करतो.
- विनयकुमार राठोड, उपायुक्त वाहतूक विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com