शहापूर जलमय

शहापूर जलमय

Published on

खर्डी, ता. ७ : (बातमीदार) : रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील भारंगी नदीला पूर आला आहे. त्यामुळे जवळच असलेल्या इमारतीच्या खाली पार्किंग केलेल्या गाड्या वाहून गेल्या. गुजराती बागेमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणीपातळी वाढली होती. तर खर्डीच्या बागेचा पाडा येथील मे महिन्यात बांधलेला पूल वाहून गेला.

आसनगाव स्थानकानजीक पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली. शहापूर-किन्हवली रस्त्यावर पाण्याचे ओहोळ निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प झाली. ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत.

आटगाव-आसनगाव स्थानकादरम्यान झाड आडवे पडल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. शहापूर नगर पंचायत हद्दीत भारंगी नदीचे सुशोभीकरण करताना कोणतेही नियोजन न केल्याने शहापूर जलमय झाले. नदीच्या पात्राजवळील सर्व इमारतींत पाणी शिरले. तर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी अडचण निर्माण झाली. खर्डी येथील बागेचा पाडा येथील मोरीवरील रस्ता वाहून गेल्याने येथील रहिवाशांचा संपर्क तुटला असल्याचे सुरेश घावट यांनी सांगितले. वासिंद रेल्वे स्थानकाजवळ पोल सरकल्याने रेल्वे वाहतूक एक तासापासून ठप्प झाल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.

नुकसानभरपाईची मागणी
आसनगाव-माहुली रस्त्यावर तीन महिन्यांपूर्वी बांधलेला पूल वाहून गेल्याने येथील संपर्क तुटला. भारंगी नदीपात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे शहापुरात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने रहिवाशांचे नुकसान झाले. याला जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी, नुकसानग्रस्त कुटुंबांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी समाजसेवक संतोष शिंदे, भानुदास भोईर व अविनाश थोरात यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.