मुंबईला पावसाने झोडपले

मुंबईला पावसाने झोडपले

Published on

मुंबईला पावसाने झोडपले
रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळित; यंत्रणांना सतर्कतेचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. रविवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने रेल्वे सेवा ठप्प झाली, रस्ते वाहतूक विस्कळित झाली. वेधशाळेने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने सोमवारी (ता. ८) प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली. त्यातच सखल भागात पाणी साचल्याने मुंबई जलमय झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागात जात परिस्थितीचा आढावा घेत यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी (ता. ८) भेट देऊन मुंबईतील आढावा घेतला. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, पालिका आयुक्त भूषण गगराणी व रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकारी होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘‘एरवी मुंबईत ६५ मिलिमीटर पाऊस झाला की अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होते. मात्र रात्रीपासून २६७ ते ३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने चुनाभट्टी, सायन या भागात पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी रेल्वेने आणि मुंबई महापालिकेने पंप बसविले आहेत. एकाच वेळी एवढा पाऊस झाल्याने त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे. पालिकेने जल साठवण टाक्या तयार केल्यामुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नसल्याचे सांगत मायक्रो टनेलिंगसारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळे निचरा होण्यासाठी मदत होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
...
मुंबईतील पाच हजार ठिकाणांवर वॉच
पालिकेच्या नियंत्रण कक्षातून पाच हजार ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत असून त्यामुळे भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही. नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
...
सखल भाग जलमय
दादर टीटी, लालबाग, परळ, भायखळा, वडाळा, चेंबूर, सायन गांधी मार्केट, चुनाभट्टी, घाटकोपर, कुर्ला, कांजूर, मुलुंड, भांडुप, वांद्रे, अंधेरी, पवई, कांदिवली, गोरेगाव, मालाड, मानखुर्द, वाशीनाका, फोर्ट, ग्रँट रोड आदी ठिकाणी पाणी साचले होते.
...
समुद्रकिनाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्त
सोमवारी दुपारी १.५७ वाजण्याच्या दरम्यान समुद्रात ४.४० मीटर उंचीची भरती होती. याच वेळी मुसळधार पाऊस कोसळला असता तर शहरात पाणी भरण्याची शक्यता होती. समुद्राला मोठी भरती आल्याने उंच लाटा मुंबई पोलिसांनी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. गेटवे ऑफ इंडिया येथे आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी समुद्रापासून लांब केले आहे. यावेळी लाऊड स्पीकरवरून सर्व पर्यटकांना समुद्रापासून दूर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. भरतीच्या वेळी कमी पाऊस होता. त्यामुळे मोठा धोका टळला. मुंबईत अग्निशमन दल, एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले.
..
रेल्वेच्या मदतीला एसटीची धाव
मुंबई, ता. ८ : मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या जादा बस चालवण्यात आल्या, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. शहरासह उपनगरातील रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्याने प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी आणि त्यांना रस्ते वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी एसटीच्या जादा बस सोडण्यात आल्या. सध्या एसटीच्या १०० टक्के बस फेऱ्या सुरू असून नियमित मार्गाव्यतिरिक्त जादा बस चालवण्यात येत आहेत. पनवेल, कुर्ला, दादर, ठाणे, कल्याण या भागांत एसटीच्या बस सोडण्यात आल्या
आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.
..
सर्वाधिक पावसाची नोंद मि.लि.मीटरमध्ये
दादर - ३१५.६
पवई - ३१४.६
डोंगरी - २९२.२
आरे कॉलनी - २५९
एचबीटी स्कूल - २५५
नारियलवाडी स्कूल - २४१.६
कलेक्टर कॉलनी - २२१.२
प्रतीक्षानगर - २२०.२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.