स्त्री-प्रधान वारली संस्कृती

स्त्री-प्रधान वारली संस्कृती

वारली ही एक आदिवासी जमात. ठाणे जिल्ह्यातील वरचा डोंगराळ भूभाग, पालघर, माहीम, जव्हार, वाडा तसेच सुरत, नाशिक, धरमपूर दमण भागांत या समुदायाची वस्ती आढळते. वारली लोक रंगाने काळे, उंचीने मध्यम, अंगानं कृश पण शरीराने काटक असतात. वारल्यांचे ‘तारपा नृत्य’ प्रसिद्ध आहे. सणासुदीला, लग्न सोहळ्यावेळी वारली पारंपरिक ‘चौक’ काढून त्यांत चित्र काढतात. वारल्यांच्या चित्रांतून त्यांच्या रोजच्या जगण्यातली दृश्य चित्रित केली जातात. ही कला मुख्यतः स्त्रियांनी जोपासली असून पुरुषांचा सहभाग त्यांत कमी दिसून येतो. वारली कुटुंब पितृसत्ताक असले तरी, वारली संस्कृती काहीशी स्त्रीप्रधान असल्यामुळे, घराचे कर्तेपण स्त्रीकडे असते. वारली जमातीचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
वारली लोक मुख्यतः शेती करतात. ज्यांच्या शेतजमिनी एकमेकांना लागून असतात, असे दहा-पंधरा लोक आपापल्या शेताजवळ राहता यावे, म्हणून एकत्र झोपड्या बांधतात. एकत्र बांधलेल्या या झोपड्या मिळून एक पाडा होतो. असे तीन-चार ते दहा-बारा पाडे मिळून एक गाव होते. वारल्यांच्या झोपड्या चौकोनी किंवा लांबट असतात. तर कोवळ्या बांबूच्या किंवा कारवीच्या असलेल्या भितींवर शेण आणि माती कालवून लिंपण केलेले असते. झोपड्यांचे छप्परही बांबूचेच असते. छपरावर सागाची किंवा पळसाची पाने पसरतात. त्या पानांवर भाताच्या पेंढ्या पसरतात. वारल्यांच्या झोपडीला पूर्वेकडे दार असते. दारापुढे ओटा किंवा पडवी असते. झोपडीला खिडक्या नसतात. उजेडासाठी भिंतीला एक लहानसे छिद्र ठेवतात. वारल्यांच्या घरात स्वयंपाकासाठी एक खोली असते. घरात उखळ, मुसळ, सूप, दुधी भोपळ्यापासून पाणी भरण्यासाठी केलेले तुंबडे, तीन-चार कोयते, एखादी कुऱ्हाड, काही गाडगी-मडकी, तिखट-हळदीच्या बांबूच्या नळकांड्या, जेवणासाठी पितळेच्या थाळ्या किंवा वाडगे असं सामान असते. झोपडीच्या मागच्या बाजूला कुंपण घातलेले परसू असते. वारली मिरच्या, सुरण, अळू, मका, काकडी, झेंडू वगैरे लावतात. लग्न झाल्यानंतरच वारल्यांमध्ये स्त्रिया लुगड्याचा पदर घेतात. लग्न होईस्तोवर त्या गुडघ्यापर्यंत तोटके कमरेभोवती घट्ट लुगडे नेसतात. वारली दुधी भोपळ्यापासून ‘तारपा’ नावाचं वाद्य बनवतात. जगात वारली चित्रकलाही प्रसिद्ध आहे.
-----------------------------------------------
‘हिरवा’ देवाची पूजा
- वारली लोक मुख्यत: भातशेती करतात. भात हे त्यांचे मुख्य अन्न आहे. नवीन भात ते एक वर्षाने खातात. भात खाण्याच्या दिवशी ते दाराला आंब्याच्या वगैरे पानांचे तोरण लावतात. वारली लोक भात ‘कणसरी’ची पूजा करतात. वारली पूजेच्या वेळी ‘भांगली’ नावाचे वाद्य वाजवतात. ‘चकमक सुकटा’ हे वारल्यांचं अग्नी निर्माण करण्याचं पारंपरिक साधन आहे. वारली लोक वाघ्या, नारन देव, हिरवा यांसारख्या आदिम देवांची पूजा करतात.
- वाघ्या हा वारल्यांचा ग्रामदेव आहे. गावाच्या सीमेवर किंवा वडाच्या झाडाखाली लाकडी ओंडक्याला शेंदूर फासून वारली लोक वाघ्याची स्थापना करतात. पीक आल्यावर वारली ‘हिरवा’ देवाची पूजा करतात. धातूच्या एका चिलिमीसारख्या पुंगळीत मोरपिसे ठासून भरून रेशमाच्या दोऱ्याने बांधलेली असतात, यालाच वारली ‘हिरवा’ देव म्हणतात. वारली लोकांमध्ये नृत्याला फारच महत्त्व आहे.

- दुलारी देशपांडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com