मुंबईत ‘फ्लडींग स्‍पाॅट’ वाढले !

मुंबईत ‘फ्लडींग स्‍पाॅट’ वाढले !

मुंबईत ‘फ्लडींग स्‍पाॅट’ वाढले !
२९५ किमी रस्त्यांची कामे अपूर्ण; मेट्रो, रेल्वेचे कल्व्हर्ट, नालेसफाईकडे निवडणुकीच्या कामामुळे दुर्लक्ष, पालिका प्रशासनाचे वाढले टेन्शन
विष्‍णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील विविध कामांची पोलखोल केली आहे. मुंबईतील ‘फ्लडींग स्‍पाॅट’ वाढले असून २९५ किमी रस्त्यांची कामे अपूर्ण असल्‍याचे समोर आले आहे.
उपनगरात मेट्रोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. रेल्वेच्या कल्वर्टची सफाई, अंतर्गत नाल्यांच्या सफाईच्या कामांकडे पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. या सर्व कामांवर पर्यवेक्षण करणारी पालिकेची यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतली होती. त्यामुळे मुंबई जलमय झाली. दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने पालिका प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे.
पावसामुळे सखल भाग जलमय झाले. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला. पाऊस आता कुठे सुरू झाला आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्यासाठी पालिका आता सतर्क झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तशा प्रशासनाला सूचना दिल्‍या आहेत.

...म्‍हणून साचले पाणी
मुंबईतील रस्त्यांची कामे अपूर्ण असल्‍याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्‍याचे पहायला मिळाले. पहिल्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामासाठी पाचव्यांदा निविदा काढण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली होती. कंत्राटदार पालिकेला मिळत नव्हते. कामे अर्धवट सोडल्याने पालिकेने कंत्राटदारांना दंडही आकारला होता. पहिल्या टप्प्यात मुंबईत ३२४ किलोमीटरच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी २९.३७ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शहर आणि उपनगरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत.

नालेसफाईचा दावा फोल
मुख्यमंत्री, पालिका आयुक्‍तांनी पाहणी केलेल्‍या परिसरातील नाल्‍यांची सफाई चांगली झाली, मात्र इतर नाल्यांच्या सफाईकडे कंत्राटदारांचे दुर्लक्ष झाले. अंतर्गत नाल्यांची सफाई झालीच नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मुंबई आणि उपनगरात ३०९ मोठे नाले आणि एक हजार ५०८ लहान नाले आहेत. त्यांच्या साफसफाईसाठी जवळपास २५० कोटी रुपये महापालिकेकडून खर्च केले जातात. शंभर टक्के नालेसफाईचा दावा पावसाने फोल ठरविला. नागरिकांनी काही नाले साफ केल्यानंतर त्यात पुन्हा कचरा टाकला, त्याचाही परिणाम दिसून आला.

मेट्रोच्या कामाचे अडथळे
मुंबई उपनगरांत मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामे सुरू आहेत. ही कामेही अपुरी असल्याने अनेक ठिकाणी पाणी भरले. या भागात नव्याने ‘फ्लडींग स्पॉट’ वाढत असल्‍याचे निदर्शनास आले आहे.

नाल्यांवर अतिक्रमण
नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात. क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पाणी वस्त्यांमध्ये शिरले. नाल्यांची पाण्याची साठवण क्षमता वाढलेली नसल्याचे दिसून येते.

रेल्वे सेवेला फटका
मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर ११६ कल्व्हर्ट आहेत. यापैकी पश्चिम रेल्वे मार्गावर ४१, मध्य रेल्वे मार्गावर ५३ आणि हार्बर रेल्वे मार्गावर २२ कल्व्हर्ट आहेत. त्यातील काही खुले, तर काही बंदिस्त मार्ग आहेत. गाळ काढणे आणि साफसफाई झाली नसल्याचा फटका रेल्वे सेवेला बसला. त्यामुळे उपनगरीय रेल्‍वे सेवा कोलमडल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com