शासन दरबारी प्रश्न मांडायची सोय नाही

शासन दरबारी प्रश्न मांडायची सोय नाही

Published on

खेळाडूंवर खैरात, आंदोलकांची उपेक्षा!
मुसळधार पावसामुळे आझाद मैदानातील आंदोलकांचे हाल
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १० :  राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानावर विविध विषयांना वाचा फोडण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमले आहेत; मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या आंदोलकांची गैरसोय झाली आहे. एकीकडे खेळाडूंवर कोट्यवधींची खैरात केली जात आहे, तर आंदोलकांना साधा आडोसाही मिळेनासा झाला आहे. 
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटना आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्तही तैनात आहे; मात्र पावसामुळे मैदानावर सर्वत्र पाणी, चिखल झाला आहे. दोन ते तीन मंडप आहेत. मात्र इतर आंदोलक उघड्यावर आहेत. आंदोलकांच्या मंडपात पाणी शिरल्याने अनेक संघटनांना आपले आंदोलन मागणी पूर्ण होण्यापूर्वीच गुंडाळावे लागले. मुंबईत पावसाचा इशारा असूनही प्रशासनाकडून आंदोलकांसाठी व्यवस्था न केल्‍याने आंदोलकांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. वाढत्या पावसामुळे बुधवारी (ता. १०) आंदोलकांच्या संख्येत घट झाली असल्याचे निदर्शनात आले.

आम्ही आमचे प्रश्न मांडण्यासाठी नंदुरबार येथून ४० ते ५० जण येथे आलो आहोत; पण पावसामुळे हाल होत आहेत. राहण्याची व्यवस्‍था नसल्‍याने काही जणांना रेल्वे स्थानकात, काही जणांना आमदार निवासात राहावे लागले. येथे प्रश्न मांडण्याचीदेखील सोय नाही. 
- संतोष गाडवे
सचिव, कंत्राटी कला क्रीडा संगणक शिक्षक

मी माझ्या दीड वर्षाच्या मुलाला सोडून आंदोलनासाठी आले आहे. जेवणाची व्यवस्था नाही. जे भेटेल ते खाऊन दिवस काढावे लागत आहेत. आम्‍ही त्रास सहन करत आहोत; पण प्रश्‍न सुटायला हवेत.
- दीपाली राजपूत
क्रीडा शिक्षक, नंदुरबार 

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आम्ही दोन दिवस आंदोलन करत आहोत; पण येथे राहण्याची व्यवस्था नाही. आम्हीच कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. 
- संदीप शिंदे
अध्यक्ष, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना

नवीन शेवा गावाला ३३.६४ हेक्टर जमीन मिळण्याबाबत बेमुदत साखळी उपोषण करत आहोत. आम्‍ही तीस ते चाळीस जण असून दहा जणांचे उपोषण सुरू आहे. भरपावसात आम्हाला उभेही राहता येत नाही.
- कमलाकर पाटील, आंदोलक

हरियानाप्रमाणे व्यवसाय शिक्षक धोरण असावे, यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. मी दोन वर्षांच्या मुलीला घेऊन आले आहे. सरकारने येथे निवाऱ्याची व्यवस्था करावी. आम्ही रेल्वे स्थानकात राहत आहोत.  
- दीपाश्री वसावे, व्यवसाय शिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.