४० गाव- पाडे कायमस्वरूपी टँकरमुक्त

४० गाव- पाडे कायमस्वरूपी टँकरमुक्त

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : मुरबाड तालुक्यात २०२० ते २०२४ या पाच वर्षांत ८६ टंचाईग्रस्त गाव- पाडे होते. यावर्षी जिल्हा परिषद ठाणेअंतर्गत जलजीवन मिशन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून ४० गाव- पाडे कायमस्वरूपी टँकरमुक्त करण्यात आले आहेत; तर ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाणी मिळावे, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जलजीवन मिशनची ७२० कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे लवकर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे विशेष प्रयत्न करत आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत मुरबाड तालुक्यात २०६ कामे असून शाश्वत जलस्रोतामार्फत ४८ ठिकाणी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तालुक्यातील जलजीवन मिशनची १५८ कामे प्रगतिपथावर आहेत. ही कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती मुरबाड गट विकास अधिकारी श्वेता पालवे यांच्या सहकार्याने जलजीवन मिशन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील ४० गाव-पाडे टँकरमुक्त केले आहेत. यासाठी उपअभियंता जगदीश बनकरी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

कोणती गावे टँकरमुक्त
तालुक्यातील खेवारे, मांडवत, मेर्दी, लोट्याची वाडी, वाघवाडी, दुर्गापूर, मोखवाडी, दांडवाडी, वाघवाडी (दुर्गापूर), भावर्थे पाडा, धानिवली, ब्राह्मणगाव, टेमगाव, रामपूर, महाज, न्हावे, बांगरवाडी (करचोंडे), बांगरवाडी (कडूशेत), पैशाखरे, प्रधानपाडा, गोड्याचा पाडा, खडकपाडा, उमरोली खुर्द, फांगणे, पेजवाडी, निरगुड पाडा (फागूळगव्हण), चासोळे (बु), तळवली, कोरावळे, तळ्याची वाडी, सोगांळवाडी (रामपूर), मेंगाळवाडी (रामपूर), शिंदीपाडा, नांदेणी, सासणे, चिल्हरवाडी, खापरी, शेलगाव, जानपाटलाचा पाडा ही ४० गाव-पाडे शाश्वत जलस्रोताच्या मदतीने कायमसाठी टँकरमुक्त करण्यात यश मिळाले आहे.


जलजीवन मिशन व विविध उपक्रमांच्या माध्यमातून न्हावे गाव कायमस्वरूपी टँकरमुक्त झाले. ही आमच्यासाठी खरोखरच आनंदाची बाब आहे.
- जगदीश हिंदूराव, संरपच

गावात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून काम उत्तम व्हावे, यासाठी सहकार्य केले. आमच्या महाज गावात पहिल्यांदा नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याने गावात आनंद साजरा केला गेला. विशेष करून महिलांना पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा उपयोग विविध रोजगार मिळवण्यासाठी होणार आहे.

– प्रदीप शिरोसे, ग्रामस्थ, महाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com