प्रवाशाला बेशुद्ध करून
लुटणारा मेरठमधून गजाआड

प्रवाशाला बेशुद्ध करून लुटणारा मेरठमधून गजाआड

Published on

प्रवाशाला बेशुद्ध करून
लुटणारा मेरठमधून गजाआड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पुणे-मुंबई प्रवासादरम्यान शिवनेरी बसमध्ये कॉफीतून गुंगीचे द्रव्य देऊन प्रवाशाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला माटुंगा पोलिसांच्या पथकाने सोमवारी मेरठमधून अटक केली. युनूस शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर आंध्र प्रदेशमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत, तसेच उत्तर प्रदेशमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, दंगल आदी गुन्ह्यांची त्याची पार्श्वभूमी आहे. माटुंगा पोलिस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

पुण्याचे रहिवासी आणि जाहिरात क्षेत्रात कार्यरत शैलेंद्र साठे १४ जूनला शिवनेरी बसने मुंबईला येत होते. त्यांनी वाकड येथून बस पकडली होती. युनूसही त्या बसमधून प्रवास करत होता. खालापूर फूड मॉल येथे युनूसने त्यांना कॉफी घेण्याचा आग्रह केला. अखेर साठे यांनी कॉफी घेतली. त्यानंतर बसमध्ये आसनस्थ होताच त्यांची शुद्ध हरपली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, पैसे चोरून युनूसने पोबारा केला होता. माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक चव्हाण, पोलिस निरीक्षक संजय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संतोष माळी, सहायक फौजदार जयेंद्र सुर्वे आणि पथकाने पुणे-दादरदरम्यानच्या थांब्यांवरील सीसीटीव्ही चित्रण गोळा करून युनूसची ओळख पटवली. त्यानंतर तांत्रिक तपासाद्वारे त्याचा मोबाईल नंबर शोधून काढला. तो मेरठला असल्याची माहिती मिळताच पथकाने तिकडे धाव घेत तीन दिवसांच्या शोधानंतर त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून सुमारे ३० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक चव्हाण यांनी दिली.
-------
दिल्ली ते मुंबई व्हाया कोल्हापूर
सावज शोधण्यासाठी युनूस याने दिल्लीहून सुरत, मुंबई, कोल्हापूर असा प्रवास केला. कोल्हापूरहून पुणेमार्गे मुंबईला येताना साठे यांना त्याने हेरले, अशी माहिती पोलिस तपासातून उघड झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.