

रोहा, ता. २७ (बातमीदार) : रयतेचे राज्य उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे धावीर नगरीत सोमवारी (ता. २६) आगमन झाले. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमले होते. महाराजांच्या पुतळ्यावर ठिकठिकाणी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
रायगड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वात उंच असलेला पूर्णाकृती पुतळा दोन दिवसांत ऐतिहासिक कुंडलिका नदी तीरावरील नियोजित स्थळी उभारण्यात येणार आहे. शिवरायांचे वंशज आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, शिवप्रेमी मंडळींच्या उपस्थितीत लवकरच पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
धावीर नगरीत उभारण्यात येणारा महाराजांचा पुतळा सर्वांसाठी स्फूर्तिदायक ठरेल, असा विश्वास या वेळी खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. सोमवारी ढोल-ताशांचा गजर, खालू बाजासह पारंपरिक वाद्य वृंदाच्या तालात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन झाले. या वेळी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवे झेंडे, पताका घेऊन शिवप्रेमींसह आबालवृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवरायांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला होता.
दमखाडी येथील त्रिमूर्ती नगर ते तीन बत्ती नाक्यापर्यंत निघालेल्या मिरवणुकीत आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, रत्नाप्रभा काफरे, लालता कुशवाह, विजय मोरे, विनोद पाशिलकर, समीर सकपाळ, महेश कोलटकर, महेंद्र गुजर, मयूर दिवेकर आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपालिका चौकात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी जमलेल्या शेकडो शिवभक्तांना संबोधित केले. शिवरायांचा पुतळा साकारणारे पुण्यातील कला संस्कार स्टुडिओचे शिल्पकार महेंद्र थोपटे व त्यांचे सहकारी, तसेच मिरवणुकीत सहभाग घेणारे सर्व ढोल पथक, झांज पथक, तसेच विविध चित्ररथाच्या प्रमुखांचा सुनील तटकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वागत मिरवणुकीत बहुतांश नागरिक पारंपरिक वेशभूषा व फेटा बांधून सहभागी झाले होते.
अंदाजे खर्च एक कोटी ७५ लाख
रोह्यात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची २५ फूट असून चबुतऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची ५० फूट असेल. कांस्य धातूमध्ये साकारण्यात आलेल्या पुतळ्याचे वजन ८.५ टन आहे. पुतळा साकारण्यासाठी अंदाजे एक कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. रोह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, अशी अनेक वर्षांपासूनची शिवप्रेमींची मागणी पूर्णत्वास आल्याने शहरात चैतन्याचे व आनंदाचे वातावरण आहे.
रोहा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.