चौघांवर कोयत्‍याने प्राणघातक हल्‍ला

चौघांवर कोयत्‍याने प्राणघातक हल्‍ला

Published on

चौघांवर कोयत्‍याने प्राणघातक हल्‍ला
अंधेरी, ता. २७ (बातमीदार) ः क्षुल्लक वादातून दोन वेगवेगळ्या घटनेत चौघांवर त्यांच्याच परिचित असलेल्या आरोपींनी कोयत्यासह चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वांद्रे आणि शिवडी परिसरात घडली. याप्रकरणी शिवडी आणि खेरवाडी पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली. किसन हरिद्वार राव आणि थेनपांडी गणपतीराज तंबी नाडर, अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही स्‍थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
पहिली घटना रविवारी (ता. २५) रात्री उशिरा दोन वाजता शिवडीतील दारूखाना, देवीदयाळ कंपाऊंड गेट क्रमांक दोनमध्ये घडली. दीपक जवाहर गौड हा याच परिसरात राहत असून मजुरीचे काम करतो. हरिद्वार गौड हा त्याचा मामा असून तो त्याच्यासोबत राहतो. काही दिवसांपूर्वी आरोपी किसन याचा दीपकच्या वडिलांसोबत झोपण्याच्या जागेवरून वाद झाला होता. त्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून रविवारी रात्री उशिरा किसनने दीपकसह त्याचा मामेभाऊ हरिद्वार यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल केला होता. त्यात दीपकच्या डोक्याला, मनगटाला, पाठीला, हाताच्या खांद्याला, कंबरेला आणि कानाजवळ, तर मामेभाऊ हरिद्वार याच्या नाकाला, डोक्याला आणि बोटाला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर किसन हा पळून गेला होता. जखमी झालेल्या दोघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शिवडी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या किसन राव याला अटक केली.
दुसरी घटना शनिवारी (ता. २४) रात्री पावणेदोन वाजता वांद्रेेतील शासकीय वसाहत, पाटील वडापाव सेंटर, राजधानी बेकरीसमोर घडली. याच परिसरात अभिषेक गोपाल रंजक हे राहत असून त्यांचा रुग्‍णवाहिका सेवेचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे रामसरोज, ऋषिकेश आणि थेनपांडी हे कामाला आहेत. काही दिवसांपूर्वी कामावरून थेनपांडी आणि रामसरोज यांच्यात वाद झाला होता. शनिवारी रात्री पावणेदोन वाजता त्यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. या वेळी थेनपांडीने रामसरोजला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती. त्यात त्याच्या छातीत दुखू लागल्याने ऋषिकेशने त्याला रुग्‍णवाहिकेमधून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने थेनपांडीने या दोघांवर चाकूने वार केले होते. खेरवाडी पोलिसांनी जखमींना व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले होते. अभिषेक रंजक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी थेनपांडीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com