मुंबईसह उपनगरांत गाेविंदा पथकांचा जल्‍लोष

मुंबईसह उपनगरांत गाेविंदा पथकांचा जल्‍लोष

Published on

मुंबईसह उपनगरांत गाेविंदा पथकांचा जल्‍लोष
साहसी प्रयत्नाने मुंबईकरांच्या काळजाचा चुकला ठोका
दिनेश चिलप मराठे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबादेवी, ता. २७ (बातमीदार): श्रीकृष्ण जन्म सोहळा मंगळवारी (ता. २७) मध्यरात्री मुंबईच्या कृष्ण मंदिरांसह अन्य मंदिरांत पार पडला. गोविंदा, गोपाळाचा गजर करीत दक्षिण मुंबईत गोविंदा पथकांची सकाळी १० वाजल्यापासूनच मानाच्या दहीहंड्या फोडण्यास चुरस वाढू लागली. गोविंदांवर आकाशातून बरसणाऱ्या वरुणराजाच्या श्रावणी जलधारांचा होणारा अभिषेक, उंचावर बांधलेल्या दहीहंडीच्या उंचीच्या थरांचा अंदाज घेत गोविंदा पथकांनी कुलाबा, कफ परेड, वाळकेश्वर, फोर्ट, काळबादेवी, मलबार हिल, डोंगरी, उमरखाडी, गिरगावसह दक्षिण मुंबईतील मानाच्या दहीहंड्या विजयी सलामी देत फोडल्या.
गोविंदांचा हंडी फोडण्याचा थरार आणि साहस पाहताना लोकांच्या काळजाचे ठोके चुकत होते. गोविंदांची एकावर एक थर रचत दहीहंडी सर करण्यासाठी चाललेली लगबग माझगाव, डोंगरी, मस्जिद बंदर, कुलाबा, कफ परेड, मेट्रो, फोर्ट, वाळकेश्वर, मलबार हिल, उमरखाडी, कुंभारवाडा, खेतवाडी, भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल, बीडीडी चाळ, ग्रॅण्ट रोड, गिरगाव, ताडवाडी परिसरात पाहायला मिळत होती.
उमरखाडी नाक्यावर मनसेच्या राजन दळवी, आज्ञा भोसले आणि वीरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाची हंडी ताडदेवाची आई गोविंदा पथकाने रचलेल्या सहा थरांच्या पहिल्याच प्रयत्नात आराध्या घोंगी या मुलीने सलामी देत फोडली. आराध्याने सलामी दिली आणि येथे उपस्थित असलेल्या लहान मुली अनन्या दळवी, ध्रुवी मांडगावकर, कारवी शिंदे, ईशा भोसले आणि महिलांनी टाळ्यांचा गजर करीत एकच जल्लोष केला.
जे. जे. रुग्णालयाच्या नवयुग गोविंदा, यंग उमरखाडी गोविंदा, श्रीराम महिला गोविंदा पथक, श्रीकृष्ण गोविंदा पथकांनी सहा थरांची दहीहंडी मानवी मनोरे रचत तीन एक्के लावत सलामी देत पहिल्याच प्रयत्नात लीलया फोडली. तरुण गोविंदांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह हंडी फोडल्यानंतर बक्षीस स्वीकारताना ओसंडून वाहताना दिसत होता.
गोविंदा आला रे आला, गोविंदा रे गोपाळा, शोर मच गया शोर, मच गया शोर सारी नगरी रे, हमाल दे धमालमधील ढाक्कुमाकुमसारखी लोकप्रिय गाणी सर्वत्र वाजत होती. या गाण्याच्या चालीवर तरुणाई जमिनीवर पाय रोवत ठेका देताना दिसत होती.
गोकुळाष्टमीला उमरखाडीतून निघालेल्या पौराणिक शोभायात्रेचे गोविंदाप्रेमींनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत केले. उमरखाडी सार्वजनिक गोकुळ काला मंडळाचे यंदाचे ७६ वे वर्ष आहे. तीन पौराणिक चित्ररथ देखाव्यांची परंपरागत शोभायात्रा पाहताना उत्तम वेशभूषा केलेले बालकलाकार आपल्या उपजत कलेचे प्रदर्शन करीत होते. ओपन ट्रक आणि कंटेनर वाहनावरील या शोभायात्रेत श्रीकृष्णाकडून बाणासुराचे गर्वहरण, भगवान श्री रामाकडून तडका राक्षसीनीचा वध आणि पंढरीची वारी अशी स्थानिक मुलांनी साकारलेली पात्रे लोकांचे लक्ष वेधून घेत होती. ही शोभायात्रा सकाळी नऊ वाजता गणेश चौक, उमरखाडी येथून सुरू होऊन दक्षिण मुंबईतील डोंगरी, उमरखाडी, कुंभारवाडा, गिरगांव, भुलेश्वर मुंबादेवी, चिंचबंदर विभागांत मार्गक्रमण करीत निघाली. या भव्यदिव्य शोभायात्रेत बँडपथक, बँजो पार्टी, ढोल-ताशांच्या तालावर रंगीबेरंगी कपडे घालून गोविंदांनी दहीहंडी फोडण्याचे कौशल्य दाखवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com