दहावी अभ्यासाचे योग्य नियोजन महत्त्वाचे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : दहावीची बोर्डाची परीक्षा म्हटले की पाल्यासह पालकांच्या मनात धडकी भरते. मात्र, अभ्यासाचे योग्य नियोजन, दहावीनंतर असलेल्या संधींची माहिती आणि त्या दिशेने वाटचाल केली की सारे काही सुरळीत होऊन जाते. याच विषयीचा कानमंत्र तज्ज्ञांनी दिला.
संजीवनी वेल्फेअर ट्रस्टच्या संयोजनातून भाजपचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळेचे योग्य नियोजन कसे करायचे? बोर्डाच्या पेपरचा पॅटर्न नीट समजून घ्यायचा, परीक्षेच्या आधी मनावर येणारा ताण कसा कमी करायचा? आदी सर्व प्रश्नांची उकल प्रसन्न हर्डीकर, गणेश देसाई, अतिष कुलकर्णी या तज्ज्ञांनी केली. गणेश देसाई यांनी अभ्यासाचे नियोजन आणि दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विज्ञान शाखेमधील संधी यावर मार्गदर्शन केले. काॅमर्स अर्थात वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा असेल, त्यासाठी कशी तयारी करावी लागते. याबाबत प्रसन्न हर्डीकर यांनी मार्गदर्शन केले.
अभ्यास करताना विद्यार्थी नेहमीच तणावाखाली असतात. तोच अभ्यास करताना तणावविरहित अभ्यासाचे नियोजन कसे करता येईल याबाबत अतिष कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आणि त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा दाखला देत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. शिबिराला डोंबिवली शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि त्यांचे पालक, तसेच शिक्षकही उपस्थित होते.
अभ्यासिका सुरू
डोंबिवलीतील स्व. विजय ऊर्फ भाऊकाका प्रधान यांच्या स्मरणार्थ आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सहकार्याने संजीवनी वेल्फेअर ट्रस्ट संचालित अभ्यासिका महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता मंदार हळबे यांनी सुरू केली. त्याचे उद्घाटन एम्स हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. मिलिंद शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मंदार हळबे, राजेंद्र हुंजे, प्रसन्न हर्डीकर, गणेश देसाई, अतिष कुलकर्णी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा गौरव
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल आयईएस चंद्रकांत पाटकर विद्यालयातील क्रिश सामंत आणि सोहम परचुरे यांना गौरवण्यात आले. त्याबरोबरच बारावीनंतरच्या सीईटी परीक्षेत यश संपादन करून आयआयटी पवईत प्रवेश मिळवल्याबद्दल त्याचाही सन्मान करण्यात आला. अतिशय खडतर परिस्थितीत अभ्यास करून सीएच्या परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल योगेश ठोंबरे याचाही विशेष सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

