दहीहंडीच्या पंढरीत थरथराटात!

दहीहंडीच्या पंढरीत थरथराटात!
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर करत दाखल होत असलेले गोविंदा पथकांचे जथ्थे... ‘ढाक्कू माक्कूम.. तुझी घागर उताणी रे गोपाळा’ गाण्यावर थिरकणारे पाय... आणि सकाळीच सलामी देत रिपरिप पडणाऱ्या पावसाच्या सरींची साथ... थरावर थर रचणारे मानवी मनोरे.. अन् कोसळणाऱ्या गोविंदांसह श्वास रोखणारा थरार... अशा जल्लोषपूर्ण वातावरणात दहीहंडीची पंढरी मानली जाणाऱ्या ठाण्यासह जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा झाला. ठाण्यातील मानाच्या मानल्या जाणाऱ्या दहीहंडींसह सर्वत्र हाच जल्लोष पाहायला मिळाला. यंदा संकल्प प्रतिष्ठान, शारदा संकल्प प्रतिष्ठान, संस्कृती प्रतिष्ठान यासह मनसेच्या हंडी या मनाच्या हंडींच्या ठिकाणी नऊ थरांचा थरथराट पाहायला मिळाला, तर संस्कृती प्रतिष्ठान येथे जय जवान गोविंदा पथकाकडून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न फसल्याचे दिसून आले.

दहीहंडीला व्यावसायिक पातळीवर घेऊन जात जागतिक विक्रम रचणाऱ्या ठाण्यात यावर्षीही तोच उत्साह व तोच जल्लोष पाहायला मिळाला. मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्वच राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केल्यामुळे जोरदार चुरस पाहायला मिळाली. मोठमोठे मंडप, उंच हंड्या, गोविंदांच्या सुरक्षेची काळजी, डीजे, ढोल-ताशे, कलाकारांची मांदियाळी हे यावर्षीचे आकर्षण ठरले, तर लाखोंच्या बक्षिसांचे लोणी चाखायला शहरातील पथकांसह मुंबईतील पथकांनीही ठाण्यात हजेरी लावली. सकाळपासूनच गोविंदा पथकांचे जत्थेच्या जत्थे शहरातील रस्त्यांवरून फिरताना दिसले. बाईक रॅली आणि ट्रक भरून आलेल्या गोविंदांचा उत्साह पाहण्यासारखा होता. गोविंदांचा हा उत्साह पावसाने आणखी द्विगुणीत केला. सकाळपासून पावसाच्या सरी मनसोक्त बरसत होत्या. नभातून कोसळणाऱ्या पाऊस धारा आणि धरणीवर रचले जाणारे मानवी मनोरे, असे दृश्य सर्वत्र पाहायला मिळत होते. पावसामुळे थर रचताना गोविंदांना अडचणी येत होत्या.

मानाची समजली जाणाऱ्या टेंभीनाक्याच्या दहीहंडीला उशिरा सुरुवात झाली, पण तिथे सलामी दिल्यानंतर गोविंदा पथकांनी आपला मोर्चा अन्य ठिकाणी वळवला. वर्तक नगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान, रघुनाथ नगर येथील संकल्प, मनसेची दहीहंडी, जांभळीनाका येथील ‘निष्ठेची दहीहंडी’, कोपरी येथील मुख्यमंत्र्यांची दहीहंडी आदी ठिकाणी गोविंदांनी गर्दी केलेली दिसली.

नऊ थर लावत सलामी
माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने नऊ थर लावत सलामी दिली, तर भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून ५५ लाखांची दहीहंडी लावण्यात आली. या ठिकाणी ठाण्यातील खोपट येथील खोपटचा राजा गोविंदा पथकाने नऊ थर लावले, तर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मनसे दहीहंडीत मुंबईतील आर्यन गोविंदा पथकाने नऊ थर लावत सलामी दिली.

‘जय जवान’चा प्रयत्न तीनवेळा फसला
ठाण्यातील दहीहंडीला जागतिक विक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वर्तक नगर येथील आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली. असे असले तरी विश्वविक्रम करण्याचा त्यांचा तीनवेळा प्रयत्न फसला असल्याचे दिसून आले.

मराठी, हिंदी सिनेकलाकारांची मांदियाळी
ठाणे शहरातील मानाच्या मानल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवात मराठी, हिंदी सिनेकलाकारांची मांदियाळी दिसून आली. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या दहीहंडी उत्सवात यावर्षीही अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली. या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, गोविंदा यांच्यासह अनुष्का दांडेकर, मराठी सिनेकलाकार प्रसाद ओक, मंगेश देसाई, क्षितिज दाते या नामवंत कलाकारांनी हजेरी लावली.

सेल्फी विथ मुख्यमंत्री
टेंभीनाका उत्सवात सहभागी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्टेजच्या खालूनच सेल्फी काढण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना हात मिळवण्यासाठी गोविंदांची धडपड सुरू होती. अनेकजण त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न करत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांनाही गोविंदांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी स्वतः स्टेजवरून खाली उतरत मोठ्या प्रमाणात गर्दी केलेल्या गोविंदांसोबत सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.

दिल्लीतून पुन्हा गल्लीत आले!
काहीजण आमच्यावर आरोप करत होते, मात्र आता तेच आता दिल्लीतून पुन्हा गल्लीत आल्याची टीका खासदार नरेश म्हस्के यांनी नाव न घेता राजन विचारे यांच्यावर केली आहे. उत्सवादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली असून आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या उत्सवाची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जपली जात असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.

‘पूर्वी बाळासाहेबांसाठी येत होतो, आता मुख्यमंत्र्यांसाठी येतो’
ठाण्यातील टेंभीनाका येथील उत्सवात मी नियमितपणे हजेरी लावतो. पूर्वी बाळासाहेबांसाठी येत होतो. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी येतो, अशी भावना या वेळी अभिनेता गोविंदा यांनी व्यक्त केली. जिथे नजर जाते, तिथे गोविंदा दिसतात, हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, कधी विचार केला नव्हता की, ठाण्यातून मुख्यमंत्री होतील, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. या वेळी त्यांनी जय श्रीराम, जय महाराष्ट्र अशा घोषणाही दिल्या.

‘सामाजिक वातावरण शांत ठेवा’
अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी आपल्या ताकदीचा वापर हा आई-वडिलांच्या सेवेसाठी खर्च केला पाहिजे, असा सल्ला त्यांच्या खास शैलीत सर्व गोविंदांना दिला. एकमेकांमध्ये भांडण करू नका, सामाजिक वातावरण शांत ठेवा, असे आवाहनही त्यांनी गोविंदांना आणि उपस्थित नागरिकांना केले.

‘उत्सव प्रत्येक वर्षी मोठा होतोय’
आम्ही प्रत्येक वर्षी या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावतो. प्रत्येक वर्षी हा उत्सव आणखी मोठा होत चालला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुनील शेट्टी यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे बंधू आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्सवाला यावंच लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी त्यांचा धडकन चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगही मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com