कुर्ल्यात राजकीय हांड्याचा जोर
कुर्ल्यात राजकीय हंड्यांचा जोर
ठसकेबाज लावणी, लोकगीतांची पर्वणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : कुर्ला परिसरात सांस्कृतिक दहीहंडींऐवजी राजकीय हंड्यांचा जोर दिसून आला. कुर्ला पूर्वेला नेहरूनगर येथे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांची, तर त्याच्याच बाजूला शिवसेना ठाकरे गटानेही मोठी हंडी बांधून राजकीय ताकद दाखवली.
कुर्ला पश्चिमेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) माजी आमदार मिलिंद कांबळे यांनी लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर २५ लाख रुपये पारितोषिकांची हंडी उभारली होती. ठिकठिकाणी लावलेले होर्डिंग पाहता संपूर्ण दहीहंडी उत्सवावर विधानसभा निवडणुकीची छाप पडल्याचे चित्र होते.
विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांच्या सर्वच संभाव्य उमेदवारांनी आपली ताकद दाखवण्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाही. लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करत सर्वच आयोजकांनी मंडळांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता, तसेच ठिकठिकाणी लागलेली दहीहंडी पथकांच्या स्वागताची होर्डिंग, नेत्रदीपक रोषणाई आणि ठसकेबाज लावणीबरोबरच लोकगिते असा सर्वत्र रंगारंग कार्यक्रम होता. सर्वच आयोजकांनी गर्दी खेचण्यासाठी सेलिब्रिटींना खास आमंत्रित केल्याचे दिसून आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
दहीहंडीच्या ठिकाणी गोविंदांबरोबरच सर्वसामान्य लोकांची गर्दी व्हावी, यासाठी आयोजकांनी वेगवगेळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच लावणी, लोकगिते, सेलिब्रिटींचे नृत्य, काॅमेडी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामुळे सर्वच ठिकाणी दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते.
तीन एक्क्यांसह सहा थर लावण्यावर पथकांचा भर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला जनसंपर्क चांगला रहावा, स्थनिक मंडळांना सोबत ठेवता यावे, यासाठी आयोजकांनी सर्वच मंडळांना आपल्या हंडीला सलामी देण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यानुसार सकाळपासूनच गोविदा पक्षकांनी कुर्ला परिसरात मोठी गर्दी केली होती. तसेच बहुतांश गोविंदा पथकांनी तीन एक्क्यांसह सहा थर लावण्यावर भर दिला होता. तसेच दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज काहीशी विश्रांती घेतली असल्याने आयोजकांसह गोविंदा पथकांचाही उत्साह चांगलाच वाढला होता.
रस्त्यावरील हंड्यांमुळे वाहतुकीला फटका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुर्ला पश्चिमेत लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावरच हंडी लावली होती. त्यामुळे एका मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती, तसेच नेहरूनगर येथेही शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या हंड्या जवळजवळच असल्याने एस. जी. बर्वे मार्गावर सकाळपासूनच वाहतूक कोंडी होती. कुर्ला स्थानकातून चेंबूरच्या दिशेने बसच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

