महिला अत्याचाराला वाचा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : कोलकाता, बदलापूर यांसह राज्यात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून त्याचे पडसाद दहीहंडी उत्सवात दिसून आले. महिलांचा सन्मान करा, बलात्कार थांबवा, माफी नाही फाशी द्या, अजून किती विरोध मेणबत्ती जाळून करायचा, सर्व स्त्रियांची काळजी घे रे महाराजा, न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारणे आदी संदेश देत गोविंदा पथकांची सामाजिक बांधिलकी डोंबिवली दहीहंडी उत्सवात दिसून आली.
पहाटेपासून पावसाची संततधार आणि त्यात गोविंदा आला रे...आला....गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा आदी घोषणांनी निनादणारा आसमंत...डिजेच्या तालावर पावसाच्या धारा झेलत एकावर एक मानवी मनोऱ्यांची सलामी...आणि यानंतर यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा यासारख्या गाण्यांवर गोविंदांसह साऱ्यांनाच ठेका धरायला लावणारे वातावरण अशा उत्साहपूर्ण वातावरणाने कल्याण-डोंबिवली शहर गोविंदामय झाल्याचे पाहायला मिळाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरात राजकीय पक्षांच्या वतीने मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सवाचे आयोजन विविध भागात करण्यात आले आहे. मध्यरात्री १२ वाजताच्या दरम्यान श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर मानाची हंडी फोडत आयोजकांनी दहीहंडी उत्सवाची रात्रीपासूनच सुरुवात केली. मंगळवारी (ता. २६) पहाटेपासून शहरात जोरदार पावसाच्या सरी बरसत होत्या. पावसाची संततधार सुरू असूनही आयोजकांसह गोविंदांचा उत्साह काही कमी झालेला दिसून आला नाही. ११ वाजल्यानंतर शहरात वातावरणनिर्मिती होण्यास सुरुवात झाली. डोंबिवलीतील बाजी प्रभू चौक, स्टेशन रोड, दीनदयाळ रोड, शिवमंदिर रोड, रामनगर, मानपाडा रोड आदी रस्त्यांवर गोविंदांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून आली. गोविंदा पथके सकाळीच जेवणाची सोय करूनच छोटे टेम्पो, बस घेऊन निघाले. दहीहंडीच्या ठिकाणी वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून गोविंदांना ठिकाणापासून काही दूर अंतरावर वाहने उभी करण्याची परवानगी देण्यात आली होती, तसेच विविध भागात वाहतूक पोलिसदेखील जातीने लक्ष देऊन उभे होते.
विकासकामांची माहिती
डोंबिवली पूर्वेतील बाजी प्रभू चौकात भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माझा प्रगतीशील महाराष्ट्र यावर आधारित विकासकामांची माहिती देणारे फलक लावत एक वेगळीच वातावरणनिर्मिती भाजपच्या वतीने करण्यात आली.
गोविंदांची रेलचेल
शिवमंदिर रोड येथे शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, रामनगर येथे विष्णू पेडणेकर, डोंबिवली पश्चिमेत भाजपचे माजी नगरसेवक मनिषा व शैलेश धात्रक, तसेच शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मानाच्या मोठ्या हंड्या फोडण्यासाठी कल्याण, डोंबिवलीसह ग्रामीण भागातील गोविंदा पथकांची मोठी रेचलेच डोंबिवलीत यावर्षी दिसून आली.
रिक्षाचालकांनी फोडली मानाची हंडी
डोंबिवलीमधील मानाची हंडी असलेल्या दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवाची सुरुवात यंदा रिक्षाचालकांनी दहीहंडी फोडून केली. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आयोजित स्वराज्य दहीकाला उत्सवात पहिली हंडी फोडण्याचा मान या चालकांना देण्यात आला.
पावसाने ओलेचिंब गोविंदा
सकाळपासून आयोजकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था उभी करत गोविंदांना सहकार्य केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये अनेक लहान गोविंदांचादेखील समावेश या वेळी दिसून आला. आयोजकांच्या वतीने गोविंदांसाठी नाष्टा, तसेच पाण्याची सोय करण्यात आली होती. या वेळी गोविंदांनी कचरा रस्त्यावरच फेकल्यामुळे शहरात रस्त्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच व नाश्त्याची पाकिटे पडल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

