

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः मुंबईत राजकीय नेत्यांच्या दहीहंड्या आज लक्षवेधी ठरल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्सवात राजकीय नेत्यांनी उत्सवाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आपापल्या मतदारसंघात मोठमोठे होर्डिंग आणि बॅनर्स लावून मतदारसंघात स्वतःची छबी झळकावण्यासाठी आघाडी, महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार चुरस दिसून आली.
----------------------------------
आघाडी विरुद्ध महायुती
आघाडी आणि महायुती यांच्या राजकीय हंड्या फोडण्यासाठी चढाओढ दिसली. यातून दोन्ही बाजूंनी फलकयुद्ध चांगलेच रंगले होते. भव्य दहीहंडीचा कार्यक्रम घेऊन एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न होताना दिसला. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह सत्ताधारी, आमदार ठिकठिकाणी आवर्जून हजर होते.
------------------------------
नेत्यांची मांदियाळी
मुंबईतील गल्लोगल्ली, कुलाबा, गिरगाव, ताडदेव, लालबाग, परळ, काळाचौकी, वरळीमधील जांबोरी मैदान व श्रीराम मिल नाका, दादरमधील आयडियलची गल्ली, शिवसेना भवन परिसर यासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आल्या. घाटकोपर, कुर्ला, मागाठाणे, कांदिवली आदी ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी नेते उपस्थित होते.
--------------------------------
पश्चिम मुंबई
बोरिवली, मागाठणे येथील आमदार प्रकाश सुर्वे, घाटकोपर पश्चिम येथे भाजप आमदार राम कदम यांच्या दहीहंडीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर नेते उपस्थित होते. भांडुपमध्ये भाजपनेते दीपक दळवी यांनी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी येथील चार थरांची दहीहंडी फोडली. मागाठाणे येथील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीला नृत्यांगना गौतमी पाटील यांनी हजेरी लावत गर्दीला आपल्या नृत्यावर थिरकायला भाग पाडले. मालाड येथे अमरचक्र गोविंदा पथकाने ८ थर रचत हंडी फोडली.
----------------
महिला गोविंदांनी फलक झळकावले
भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्याकडून आयोजित दहीहंडीमध्ये महिला गोविंदांनी पोस्टरबाजी केली. ‘अजून किती विरोध, मेणबत्ती जाळून कारायचा, पण नराधमाला कधी जाळायचा’ असे बॅनर या गोविंदानी झळकवले. त्याची चांगली चर्चा झाली. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी केली होती.
.....
गोविंदांना वेगाची झिंग
गोविंदांनी बाइक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर काढल्या होत्या. या बाइक रस्त्यांवर सुसाट धावताना दिसत होत्या. अनेक गोविदांना वेगाची झिंग चढल्याचे दिसत होते. बाइकस्वारांकडून हेल्मेटचा वापर केला जात नव्हता. सुरक्षेचे नियम पाळल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
----------------------------------------
वाहतूक कोंडी
दादरसह काही मार्ग बंद करण्यात आले होते. येथील वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.