

सेवानिवृत्त पोलिस महासंचालकांवर खंडणीचा गुन्हा
प्रकरण दाबण्यासाठी पैशांच्या मागणीचा आरोप
ठाणे, ता. २७ (वार्ताहर) : खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याप्रकरणी निवृत्त पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्यांना मदत करणाऱ्या अन्य सहा जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वादात असलेल्या संजय पांडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणामुळे संजय पांडे वादात सापडले होते. त्यानंतरही त्यांच्यावर अनेक आरोप झाले. ईडी, सीबीआयपर्यंत तपास पोहचला. असे असताना त्यांच्या अडचणीत आणखी वाढ करणारा गुन्हा ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. व्यावसायिक संजय पुनमिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार २०१६ साली ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास बेकायदेशीर झाला. त्यानंतर या प्रकरणातील तक्रारदार आणि व्यवसायिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या देत पैसे उकळण्यात आले. यासाठी सरकारी वकिलांनी खोटे दस्ताऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल केली. मे २०२१ ते ३० जून २०२४ पर्यंत हा त्रास सुरू होता; पण आरोपींकडून त्रास सहन न झाल्याने तक्रार दाखल करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पुनमिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी निवृत्त पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह याप्रकरणी त्यांना मदत करणारे वकील शेखर जगताप, सेवानिवृत्त एसीपी सरदार पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल, शरद अग्रवाल व इतरांच्या विरोधात ठाणेनगर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथील रहिवासी असलेले फिर्यादी पुनमिया यांनी सोमवारी ई-मेलद्वारे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी (ता. २६) रात्री गुन्हा दाखल केला. याप्रकरणात अद्यापपर्यंत कोणालाही अटक झालेली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
दाखल गुन्ह्याचे स्वरूप
शासकीय कर्मचाऱ्यांचे गैरवर्तणूक (कलम १६६ अ आणि १७०), फौजदारी कट (कलम १२० बी), खोट्या पुराव्यांची निर्मिती (कलम १९३), खोटे विधान, न्यायालयीन कामात अडथळा (कलम १९५,१९९,२०३,२०५), हल्ला, जबरदस्ती, खोटी दस्तावेज तयार करणे आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.