

धरणांसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन २०२३ मध्ये मात्र मोबदला २०१९च्या बाजारमूल्यानुसार!
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : राज्यातील विविध जलसिंचन प्रकल्पांसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत; त्या शेतकऱ्यांना मोबदला देताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन २०१९चे जमीन खरेदी-विक्रीचे नोंदणीकृत व्यवहार गृहीत धरले जाणार आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. २४ जानेवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या शासनाच्या परिपत्रकामुळे मोबदल्याची रक्कम ठरवताना आधीचे एक वर्ष वगळण्यात येत असते. या नियमाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. कोरोना काळात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेले नाहीत; त्यामुळे सन २०१९ मधील व्यवहार गृहीत धरले जाणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सन २०२३ मध्ये ११ (१) ची अधिसूचना प्रसिद्ध केलेल्या प्रकल्पांसाठी एक वर्षाची अट शिथिल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी राज्य शासनाकडून विविध सिंचन प्रकल्प राबविण्यात येत असतात. या प्रकल्पांसाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे; त्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असते. हा मोबदला देण्यासाठी जी प्रक्रिया राबविण्यात येत असते, त्यामध्ये ११(१)ची अधिसूचना महत्त्वाची आहे. या अधिसूचनेच्या अनुषंगाने जानेवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन परिपत्रक क्र. संकीर्ण -२०२३ /प्र. क्र. ०२/ अ -२ मधील नियमावलींवर बोट ठेवून दरनिश्चिती करीत शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार आहे. या परिपत्रकानुसार भूसंपादनाची ११ (१)ची अधिसूचना निर्गमित झालेल्या दिनांकाच्या एका वर्षातील खरेदी-विक्री व्यवहार वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे सन २०२३ या वर्षात ज्या प्रकल्पांसाठी ११ (१)ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे, त्या प्रकल्पांसाठी त्या क्षेत्रातील २०१९, २०२० व २०२१ चे जमीन खरेदी-विक्रीचे नोंदणीकृत व्यवहार ग्राह्य धरण्यात येणार आहेत, परंतु सन २०२२ पर्यंत कोरोना महामारीमुळे या काळात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेले नाहीत. त्यामुळे या काळातील जमीन दर ग्राह्य धरता येणे शक्य नाही. ही अडचण निर्माण झाल्याने आता प्रकल्पांमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना मोबदला देताना २०१९ मध्ये नोंद झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारांचा विचार केला जाणार आहे. तेव्हाचे दर आणि आताचे दर यांच्यात प्रचंड तफावत असून सन २०१९ मध्ये अत्यंत कमी दर असल्याने सरकारी प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
‘सैनिकांचे गाव’ अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शिवतर गावातील आजी-माजी सैनिकांनी, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या जलसिंचन प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसपांदन करण्याची प्रक्रिया कोविडनंतर राबविण्यास सुरुवात झाली असून या प्रकल्पातील भूसंपादनासाठी २० एप्रिल २०२३ रोजी ११ (१) ची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२३/ प्र.क्र.०२/अ -२, दिनांक २४ जानेवारी २०२३ नुसार अधिसूचना प्रकाशित केलेली तारीख २० एप्रिल २०२३ ही असल्याने दिनांक १९ एप्रिल २०२३ ते दिनांक १९ एप्रिल २०२२ या कालावधीमध्ये झालेले खरेदी-विक्रीचे नोंदणीकृत व्यवहार वगळावे लागणार आहेत. त्याचा आर्थिक फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे.
..
मुख्यमंत्र्यांकडे दाद
शासकीय परिपत्रकानुसार भूसंपादन दर निश्चितीसाठी २०१९, २०२० व २०२१ मधील जमीन खरेदी-विक्रीचे दर ग्राह्य धरले जाणार आहेत, परंतु २०२० ते २०२२ पर्यंत कोरोना काळात व्यवहार झाले नाहीत. परिणामी, २०१९ मधील खरेदी-विक्रीचे दर ग्राह्य धरले जाणार आहेत. त्या वेळी या भागात जमिनीचा दर हा प्रति गुंठा दोन हजार ६४९ रुपये इतका होता, तर हाच दर आता प्रति गुंठा नऊ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे; असे असताना जलसिंचन प्रकल्पांसाठी आपल्या वडिलोपार्जित जमिनी दिलेल्या आजी-माजी सैनिकांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. यासंदर्भात सरपंच सुभाष मोरे, उपसरपंच मंगेश मोरे व शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पांडुरंग मोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली असून सन २०२३ साठी ही अट शिथिल करण्याची विनंती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.