

पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन व ईद-ए-मिलादच्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात, यासाठी पोलिस, महापालिका व जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिल्या. या वेळी नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात आयोजित पोलिस व महापालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते शुक्रवारी बोलत होते. पालकमंत्री देसाई यांनी या वेळी जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या उपाययोजना, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, विसर्जनस्थळाच्या सुविधा याबद्दल सर्व पोलिस आयुक्तालये व महापालिकांकडून सविस्तर माहिती घेतली. या वेळी ते म्हणाले की, ‘‘महापालिका व नगर परिषद हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे १०० टक्के भरण्यात यावेत. पाऊस कमी झाला आहे, नालेसफाई तत्काळ करून घ्यावी. यासाठी आवश्यक तेथे नाल्यांची स्वच्छता करून घ्यावी. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. २४ तास विद्युतपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. विद्युत विभागाने दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करून घ्यावीत.’’
‘‘मोठ्या गणशोत्सवामध्ये गर्दीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवावा. महिलांची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी. श्रींच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मिरवणुका शांततेत पार पडायला हव्यात. विसर्जनाच्या ठिकाणी वॉर्ड अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. कृत्रिम तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा ठेवावा. जेणेकरून मूर्ती विसर्जन व्यवस्थित होईल. मूर्तीची विटंबना होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. महिला, बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलिस विभागाने घ्यावी’’, असेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या वेळी सांगितले.
..
मांसविक्रीचा निर्णय आयुक्तांच्या स्तरावर
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील उत्सव कालावधीत मांसविक्रीचा निर्णय स्थानिक पक्ष व सामाजिक संघटना यांनी एकत्रित समन्वयाने घ्यावा. याचे नियोजन व नियंत्रण मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांनी करावे, असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज झालेल्या बैठकीत दिले. गणेशोत्सवासंदर्भात ठाणे जिल्ह्यातील महापालिका आयुक्त व सर्व यंत्रणांची बैठक घेऊन सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या वेळी पालकमंत्र्यांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.