

सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा
वाढवण बंदराच्या विरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन
कासा, ता. ३० (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ३०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविकास आघाडी, वाढवण विरोधी बंदर संघर्ष समिती, तसेच स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात केंद्र शासनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. या प्रेतयात्रेची वाढवण बंदर येथे
सांगता करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्ह्यात दाखल होणार असल्याने डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी सकाळपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गावातील प्रत्येक नाक्यावर पोलिस तपासणी सुरू होती. वरोर नाका, वाढवण नाका आणि अन्य ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता, मात्र या बंदोबस्तातही वाढवण बंदराच्या विरोधात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा देत, प्रतीकात्मक तिरडी बांधून प्रेतयात्रा काढली. त्यानंतर घोषणाबाजी करत बंदराच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. ‘आम्ही आत्मनिर्भर आहोत, आम्हाला वाढवण बंदर नको’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे नेतृत्व डहाणूचे आमदार विनोद निकोले, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, ब्रायन लोबो, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी केले. या आंदोलनात माजी आमदार कपिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, पंचायत समितीचे उपसभापती पिंटू गहला यांच्यासह हजारो ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या वेळी स्थानिक मच्छीमार, शेतकरी, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
बोटींवर निषेधाचे काळे झेंडे
डहाणू खाडीत सुमारे तीनशे मच्छीमार बोटी काळे फुगे आणि काळे झेंडे लावून वाढवण बंदराच्या विरोधातील जल आंदोलनात सहभागी झाल्या. मच्छीमारांनी हा प्रकल्प आपल्यासाठी घातक ठरेल, अशी चिंता व्यक्त केली. या आंदोलनादरम्यान महिलांनीही घोषणाबाजी करत मोठा आवाज उठवला.
वाढवण बंदरामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. शासनाने हा प्रकल्प रद्द करावा
सुनील तांडेल, स्थानिक मच्छीमार
वाढवण बंदराच्या या प्रकल्पाच्या आड येथील भूमीवर कब्जा करण्याचा डाव सरकारच्या माध्यामातून साधला जात आहे. आम्ही या प्रकल्पाच्या निषेधार्थ संघर्ष करणार आहोत.
- प्रणाली राऊत. पर्यावरण अभ्यासक
केंद्र सरकारच्या दबावाखाली वाढवण बंदराचे काम सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे, मात्र या प्रकल्पाविरोधात आम्ही शांततेत आंदोलन केले आहे. पुढील आंदोलन मात्र शांत राहील याची शाश्वती नाही. या बंदराला कायम विरोधच राहणार आहे.
- विनोद निकोले, आमदार, डहाणू
..
केंद्र शासनाच्या हुकूमशाहीला आम्ही कडाडून विरोध करणार आहोत. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असूनही त्याचे उद्घाटन करण्यात आले, हे अत्यंत अन्यायकारक आहे.
- सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड
काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील पोलिसांच्या ताब्यात
वाडा (बातमीदार) : काॅँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील हे शुक्रवारी सकाळी पालघर येथे वाढवण बंदराचा विरोध करण्यासाठी जात असताना वाडा पोलिसांनी त्यांच्यासह व काॅँग्रेसचे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या वेळी प्रफुल्ल पाटील व काॅँग्रेसचे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
..
पालघरच्या तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन
मनोर (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पालघरच्या तहसीलदार कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. ३०) आंदोलन केले. तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या मांडून मविआच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकावून वाढवण बंदराचा निषेध केला. या वेळी आंदोलनकर्त्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
...
उत्तनमध्ये मच्छीमार संघटनेचे नेते नजरकैदेत
भाईंदर (बातमीदार) : वाढवण बंदराचा निषेध म्हणून उत्तनमधील मच्छीमारांनी समुद्रकिनाऱ्यावर काळे झेंडे दाखवून आंदोलन केले, मात्र पोलिसांनी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे झेंडे जप्त केले. दुसरीकडे मच्छीमारांचे ज्येष्ठ नेते लिओ कोलासो, तसेच बर्नड डिमेलो यांना शुक्रवार (ता. ३०) सकाळपासूनच पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते.
वाढवण बंदराला मच्छीमार संघटनांनी तीव्र विरोध करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मच्छीमारांचे नेते लिओ कोलासो पालघर येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले असतानाच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुसरीकडे बर्नड डिमेलो यांना उत्तनमध्येच ताब्यात घेण्यात आले. दोन्ही नेत्यांना सुमारे तासभर उत्तन सागरी पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर दोघांना त्यांच्या कार्यालयातच पोलिसांच्या पहाऱ्यात नजरकैदेत ठेवण्यात आले व त्यांना नोटीस बजावण्यात आली, मात्र मच्छीमारांनी मागे न हटता आपले आंदोलन सुरू केले. उत्तनमधील भुतोडी बंदर, पाली येथील समुद्रकिनाऱ्यावर, तसेच चौक बंदरावर तीव्र निदर्शने करण्यात आली केली. या वेळी मच्छीमारांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले, मात्र पोलिसांनी त्या ठिकाणीही कारवाई करत काळे झेंडे जप्त केले. वसई, पालघर, डहाणू, तसेच मुंबईतही सर्व ठिकाणी वाढवण बंदराविरोधात मच्छीमार तीव्र आंदोलन करत आहेत, असे असताना उत्तनमध्येच मच्छीमारांना आंदोलन करण्यास मनाई का, असा संतप्त सवाल बर्नड डिमेलो यांनी उपस्थित केला.
वाहतूक व्यवस्था कोलमडली; प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल
मोखाडा (बातमीदार) : वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. नरेंद्र मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागले होते. यासाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ५५० बस अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील नियमित बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. परिणामी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शुक्रवारी कोलमडली. यामध्ये प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. प्रशासनाने एसटीच्या जिल्ह्यातील बहुतांश बस अधिग्रहीत केल्याने, लांब पल्ल्याच्या तसेच नजीकच्या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे कार्यालयात पोहोचणाऱ्या चाकरमानी, शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. या वेळी प्रवाशांना इच्छीतस्थळी जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने, ज्यादाचे पैसे देत दाटीवाटीने प्रवास करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.