

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : १० दिवसांच्या पाहुणचारासाठी आलेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची घटिका जवळ आली आहे. त्यामुळे आगमनासारखीच गणरायाची विसर्जन मिरवणूकही दणक्यात करण्याची लगबग सुरू झाली आहे. हा संपूर्ण सोहळा निर्विघ्न पार पडावा, यासाठी ठाणे महापालिका प्रशासनासह पोलिसही सज्ज झाले आहे. १० दिवसांचे बहुतेक मोठे गणपती विसर्जनला असणार आहेत. त्यामुळे कृत्रिम तलावांसह विशेषकरून महाविसर्जन घाटावर चोख तयारी करण्यात आली आहे. विसर्जन घाटाच्या स्वच्छतेपासून ते सुरक्षेपर्यंत सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. विशेष म्हणजे यंदा मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी सज्ज असणारी स्ट्रायकिंग मोबाईल यंत्रणेची खीराव तुकडीही पोलिस वापरणार आहेत.
ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये यंदा १० दिवसांच्या ७६३ सार्वजनिक, तर घरगुती ४० हजार ६९६ गणेशमूर्तींची स्थापना झाली आहे. त्यापैकी ठाणे आणि वागळे परिमंडळामध्ये सुमारे २५३ सार्वजनिक, नऊ हजार ३९५ खासगी मूर्तींचा समावेश आहे. यासह नजीकच्या मुलुंड, ऐरोली, दिघा येथूनही मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जनासाठी ठाण्याच्या घाटावर येतात. त्यामुळे १९ हजार श्रींच्या मूर्तींचे विसर्जन बुधवारी (ता. १८) अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी होण्याची शक्यता आहे. हा महासोहळा व्यवस्थित पार पडावा, यासाठी पोलिसांसोबत ठाणे महापालिका प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.
शहरात नऊ विसर्जन घाट
श्री गणेशमूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे, या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी (चेंदणी कोळीवाडा), कळवा पूल (निसर्ग उद्यान), कळवा (ठाणे बाजू), बाळकूम घाट आणि दिवा घाट असे एकूण नऊ विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. येण्या-जाण्याचे मार्ग आखून देण्यात आले असून श्रींची मूर्ती घाटापर्यंत आणण्याची व्यवस्था केली आहे.
फिरत्या विसर्जनाची सोय
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे पालिकेने १५ कृत्रिम तलाव उभारले असून १० मूर्ती स्वीकृती केंद्र आणि ४९ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था उभारली आहे. विशेष म्हणजे यंदा सहा फिरत्या विसर्जनाची सोयही करण्यात आली आहे. निर्माल्य संकलनासाठी प्रत्येक घाट, विसर्जनस्थळावर कलश ठेवण्यात आले आहेत.
बचाव पथक, वैद्यकीय सेवाही तैनात
नागरिकांना श्री गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा, यासाठी विशेष व्यवस्था, गणेशभक्तांच्या वाहनांसाठी वाहनतळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या कृत्रिम तलावाच्या ठिकाणीही व्यवस्था उभारण्यात आली आहे.
सीसीटीव्ही, बॅरेकेटींग, विद्युत व्यवस्था
बाप्पाची मिरवणूक आणि विसर्जन सुरळीत पार पडावे, यासाठी ठाणे पोलिस प्रमुख मंडळांच्या मंडपापासून ते विसर्जनस्थळापर्यंत नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेणार आहेत. त्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली असून मार्गातील दुकानांच्या सीसीटीव्हीचीही मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय विसर्जनस्थळांवर गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बॅरेकेट्स लावण्यात आले आहेत. विसर्जन रात्री उशिरापर्यंत होत असल्याने प्रखर विद्युत व्यवस्था आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
चोख बंदोबस्त
विसर्जनासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्तही तैनात ठेवला आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ५०७ अधिकाऱ्यांसह २६२९ अंमलदार, ५४४ महिला अंमलदार, राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या असे एकूण ३३६८ पोलिस बळ आणि ८०० होमगार्डचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. पाच स्ट्रायकिंग मोबाईल, एक राखीव स्ट्रायकिंग मोबाईलही या वेळी सज्ज असणार आहेत.
विशेष स्वयंसेवकांची नियुक्ती
गणपती विसर्जनाच्या दिवशी सुरक्षेची व्यवस्था पाहण्यासाठी पोलिस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाचे जवान, तसेच इतर स्वयंसेवक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जीवन रक्षकांची मदत घ्या
कृत्रिम तलावांसह सर्वच प्रमुख घाटांमध्ये श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करण्याण्साठी जीवन रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मोठ्या घाटांवर पाच ते दहा जीवन रक्षकांची व्यवस्था आहे. त्यामुळे घाटात उतरून मूर्ती विसर्जन करण्याचा गणेशभक्तांनी अट्टाहास न करता जीवन रक्षकांकडे सोपवावी. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळण्यास मदत होईल असे, आवाहन पोलिसांच्या विशेष पथकाचे उपायुक्त सचिन गोरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचा मार्ग सुकर करणारी राखीव स्ट्रायकिंग मोबाईल यंत्रणाही विसर्जनासाठी वापरण्यात येणार आहे. दरम्यान, प्रत्येक मंडळांसाठी दोन ते १२ असे पोलिस मिरवणुकीदरम्यान उपस्थित राहणार आहेत. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यावर त्यांची करडी नजर असेल.
- सचिन गोरे,
उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे पोलिस
१० दिवसांचे गणपती
परिमंडळ सार्वजनिक खासगी
ठाणे १०१ ३,७९८
भिवंडी १३३ ३,७८५
कल्याण १६८ १४,३३०
उल्हासनगर २०९ १३,२६६
वागळे १५२ ५,५९७
जिल्ह्यातील विसर्जन व्यवस्था
भिवंडी : नदी नाका, वर्हाळदेवी घाट, काल्हेर खाडी आणि २७ ठिकाणी विसर्जन होणार आहे. १० कृत्रिम तलावही उभारण्यात आले आहेत.
कल्याण : दुर्गाडी गणेश घाट आणि ७४ ठिकाणी विसर्जन होणार आहे. २८ कृत्रिम तलावही उपलब्ध आहेत.
उल्हासनगर : उल्हासनदी, मोहना घाट, कल्याण खाडी, १२ कृत्रिम तलावांसह १७ ठिकाणी विसर्जन व्यवस्था उपलब्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.