

खड्ड्यांमुळे डोंबिवलीत रस्त्यांची दुरवस्था
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे; मात्र कंत्राटदार भरपावसात रस्त्यावर सिमेंटमिश्रित मातीचा भराव खड्ड्यात टाकत आहेत. त्यामुळे पावसात हा भराव टिकाव धरत नाही. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. या दिवसांत ही कामे करणे गरजेचे आहे; मात्र ती कामे होताना दिसत नाहीत, तसेच खड्ड्यांत माती टाकून ठेकेदार रस्त्यांची उंची वाढवत असल्याची टीका नागरिक करत आहेत. त्यामुळे खड्ड्यांकडे प्रशासन लक्ष देणार का, असा सवालदेखील उपस्थित केला जात आहे.
गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल, तसेच खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. प्रत्येक प्रभागात खड्डे बुजविण्याच्या कामासाठी प्रशासनाने कंत्राटदारांची नेमणूकदेखील केली आहे; मात्र दरवर्षीप्रमाणे पावसाने पालिकेच्या या आश्वासनावर पाणी फेरल्याचे दिसून आले. गणेशाचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका या खड्ड्यांतूनच झाल्या. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. कडकडीत ऊन पडू लागले आहे. त्यातच दोन तीन दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला, मात्र आता पावसाने पुन्हा उघडीप दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामाला त्वरित सुरुवात कंत्राटदारांनी करायला हवी. जेणेकरून कडक ऊन्हामुळे डांबर लवकर सुकल्याने रस्ता काही दिवस तरी तग धरेल, असे मत जाणकार मांडत आहेत.
ठिकठिकाणी दांडिया कार्यक्रम
ठेकेदार भरपावसात रस्त्यावर केवळ खडी किंवा कधी कधी सिमेंटमिश्रित बारीक खडीचा मुलामा टाकून रस्त्यावर रोडरोलर फिरवत आहेत; मात्र पावसामुळे हे काम काही तासदेखील टिकून राहत नाही. यामुळे सामान्यांच्या खिशातून जाणारा कर हा खड्ड्यात जात असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. आता नवरात्रोत्सव केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. डोंबिवलीत ठिकठिकाणी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दांडिया उत्सवाला अनेक नेतेमंडळी, सेलिब्रिटी उपस्थिती लावतात. त्यामुळे सेलिब्रिटी, राजकीय नेते ज्या मार्गावरून मार्गक्रमण करतील, त्याच रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम लोकप्रतिनिधी करतील, मात्र इतर रस्त्यांकडे ते ढुंकूनदेखील पाहणार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.