

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. ३० : वसई-विरार शहरात पर्यायी मार्ग, रिंग रूट सेवेचा अभाव आहे. त्यातच रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण, बेवारस वाहने असतात. शहरात वाहनतळांचा अभाव असल्याने कोंडीचा फटका नागरिकांना सहन रोजच करावा लागत आहे; मात्र गेल्या तीन वर्षांत दोन लाख २७ हजार वाहनांची संख्या वाढली असल्याचे समोर येत आहे. यात एकूण ११ हजार ५२९ नागरिकांनी ई-वाहने खरेदी केली आहेत.
वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. दैनंदिन वापरासाठी पर्याय म्हणून नागरिक वाहने खरेदी करतात. तसेच, पर्यटनासाठी शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने अनेक वाहनाने प्रवास करत असतात. वाहन खरेदी केल्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी करणे, बंधनकारक असते. याखेरीज व्यवसायासाठीदेखील वाहने खरेदी केली जात आहेत. एकीकडे वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार भागात रस्त्यांचा अभाव आहे, तर दुसरीकडे धूळखात पडलेली बेवारस वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. तसेच, अनेक ठिकाणी फेरीवाल्यांचे अतिक्रमण असते.
सिग्नल यंत्रणेत बिघाड, औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर कोंडी अशा बाबींना सामोरे जावे लागत असताना गेल्या तीन वर्षांची वाहन खरेदी आकडेवारी पाहता कमालीची वाढली आहे. २०२१-२२ या वर्षात १,५७८ ई-वाहने होती; मात्र २०२३-२४ या वर्षामध्ये पाच हजार ४२४ वाहने खरेदी केली असल्याने ई-वाहनांकडेदेखील नागरिक धाव घेत असल्याचे दिसून येत आहे.
वसई पूर्व-पश्चिम परिसर जोडणारे दोन पूल आहेत; मात्र त्यातील जुना अंबाडी उड्डाणपूल नादुरुस्त आहे. त्यामुळे एकाच पुलावरून दुतर्फा वाहतुकीचा भार येत आहे. नालासोपारा पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाखालील रस्ते अरुंद आहेत. अशात पुलावरून सुरू असणाऱ्या वर्दळीला कोंडीचे विघ्न येते, तर पश्चिमेकडून पूर्वेला जाणाऱ्या विरार येथील पुलावर व खाली हीच परिस्थिती नेहमी असते. वाहनांची संख्या वाढणार आहे; मात्र वसई-विरार महापालिकेने हे लक्षात घेता पर्यायी मार्ग, रिंग रूट सेवा, तसेच कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृतिशील उपाययोजना केल्या पाहिजेत; अन्यथा प्रचंड कोंडी आणि प्रदूषणाला निमंत्रण असे चित्र वसई-विरार शहरात निर्माण होणार आहे.
ई-वाहनांसाठी चार्जिंगचा अभाव
पर्यावरणपूरक अशी ई-वाहने जरी नागरिक खरेदी करत असले, तरी शहरात चार्जिंग स्टेशनचा अभाव आहे. त्यामुळे या वाहनांमधील बॅटरीची क्षमता संपली तर ती चार्जिंग कुठे करायची, ही चिंता निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी वाहनचालक करू लागले आहेत.
सुविधांअभावी समस्या
शहरात वाहतुकीला पूरक वातावरण नाही. वाहनतळांचा अभाव आहे. वाहनांची संख्या वाढत असली तरी वाहने सुरक्षित उभी कुठे करायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे वाहनतळ नसताना मात्र कारवाईचा बडगा उभारण्यासाठी प्रशासन त्वरित लक्ष घालते; परंतु सुविधा देण्यास अपयशी ठरत आहे.
वाहने खरेदी केल्यावर त्याची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे केली जाते. वसई-विरार शहरात ई-वाहने खरेदीकडेदेखील नागरिकांचा कल आहे.
- प्रवीण बागडे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
मागील तीन वर्षांतील आकडेवारी
२०२१-२२ ५७ हजार ६५५
२०२२-२३ ८० हजार ४२७
२०२३-२४ ८९ हजार ८०८
ई-वाहनांची खरेदी
२०२१-२२ १,५७८
२०२२-२३ ४,५२७
२०२३-२४ ५,४२४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.