

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : अंधेरी पूर्वेतील सिप्झ परिसरात पर्जन्य जलवाहिनी कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २५ सप्टेंबरला घडली होती. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने अहवाल महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना सादर केला आहे. घटनास्थळाचा परिसर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)चे कंत्राटदार एल ॲण्ड टी यांच्या ताब्यात असल्याने तेथील त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी या दोन संस्थांची असल्याचा निष्कर्ष समितीने मांडला आहे.
तीन सदस्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. या समितीचे अध्यक्ष परिमंडळ ३ चे उपआयुक्त देविदास क्षीरसागर होते. प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ यांचा या समितीत समावेश होता.
अहवालातील निष्कर्षानुसार, हे घटनास्थळ व सभोवतालचा परिसर हा २०१५ पासून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)चे कंत्राटदार एल ॲण्ड टी यांच्या ताब्यात आहे. महापालिकेच्या के पूर्व विभागाने प्रत्यक्ष स्थळ पाहणीत आढळलेल्या त्रुटी कंत्राटदार एल ॲण्ड टी यांना कळवल्या होत्या. त्यावर महापालिकेला काही त्रुटी आढळल्यास त्यांची पूर्तता करण्यास बांधिल आहे, असे एल ॲण्ड टी यांना २४ ऑगस्ट २०२४ व २९ ऑगस्ट २०२४ च्या पत्राद्वारे एमएमआरसीएल यांना सादर केले होते. दुर्घटनेच्या ठिकाणांच्या त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी एमएमआरसीएलचे कंत्राटदार एल ऍण्ड टी व एमएमआरसीएल यांची आहे, असा निष्कर्ष काढला आहे. दरम्यान, दुर्घटना घडली तो रस्ता हा मुख्य रस्ता असल्याने व अतिवृष्टीचा इशारा दिला असताना महापालिकेच्या विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांनी दक्ष राहणे आवश्यक होते, असा निष्कर्ष समितीने काढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.