अंगणवाडीताईंना लाडक्या बहिणींच्या अर्जाच्या मानधनाची प्रतीक्षा

अंगणवाडीताईंना लाडक्या बहिणींच्या अर्जाच्या मानधनाची प्रतीक्षा
Published on

जव्हार, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील ३५८ अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतले. यात बहिणींना पहिल्या तीन महिन्यांचे मानधनदेखील आले, परंतु लाडक्या बहिणीला मानधन मिळवून देणारी अंगणवाडीताई उपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या अर्जांचे पैसे नेमके कधी मिळणार, असा प्रश्न तालुक्यातील अंगणवाडीताईंना पडला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये देऊ, असा शासन निर्णय ही योजना सुरू झाली तेव्हा झाला होता. दरम्यान, योजना जाहीर होऊन जवळपास तीन महिने उलटले. लाडक्या बहिणींना तीन हप्तेही मिळाले, तरी अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्याचे त्यांचे हक्काचे प्रोत्साहनपर भत्त्याचे प्रत्येकी ५० रुपये अद्यापही दिलेले नाहीत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याचे जाहीर करून अर्ज सादर करणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन महिन्यांचे साडेचार हजार जमा झाले, मात्र अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या हक्काचे ५० रुपये सरकारी लालफितीत अडकल्याचे चित्र आहे. यापूर्वी जुलै आणि ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत होती, परंतु या योजनेचा प्रतिसाद पाहता ही मुदत सप्टेंबरपर्यंत वाढविली गेली. दोन महिने अर्ज भरल्यानंतरही अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यावर बोलण्यासाठी सरकारला वेळच नाही.

दुसरीकडे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात महिला सन्मान मेळावा झाला. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात रुपये खर्च केले, मात्र ज्यांच्यामुळे ही योजना यशस्वी झाली आहे, त्या अंगणवाडी सेविकांचा सरकारला विसर पडला आहे.

मदतीची प्रतीक्षा
ही योजना रक्षाबंधन सणाला सुरू झाली. त्यानंतर गणेशोत्सव हा सणदेखील झाला. महत्त्वाचे म्हणजे जव्हार शहरातील ऐतिहासिक व प्रसिद्ध उरुस हा सणदेखील पालटून गेला. आता दिवाळी तोंडावर येत आहे, तरी आमच्या मेहनतीचे पैसे आम्हाला द्या, अशी मागणी अंगणवाडी सेविकांकडून केली जात आहे.

अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ मिळावी, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे, मात्र त्याला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केले. पुन्हा या लाडक्या बहिणीच्या योजनेतील प्रोत्साहनपर भत्त्यासाठी पण आंदोलनच करावे लागणार की काय, हा प्रश्न सतावत आहे.
- केतकी भोये, अंगणवाडी सेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com