

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या उपायुक्त पदावरून संजय दोंदे हे सोमवारी (ता. ३०) निवृत्त झाले. दोंदे हे महापालिकेचे स्थायी कर्मचारी होते. आता त्यांच्या जागी उपायुक्तपदी बसू शकणारे महापालिकेचे अन्य अधिकारी लाचलुचपत विभागाच्या कारवाईत अडकले आहेत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना उपायुक्तपदी पदोन्नती देणे शक्य होणार नाही. परिणामी या पदावर पुन्हा एकदा राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
महापालिकेत उपायुक्त पदाच्या चार जागा मंजूर आहेत. त्यापैकी दोन जागा महापालिकेच्या स्थायी कर्मचाऱ्यांमधून व दोन जागा प्रतिनियुक्तीद्वारे भरायच्या आहेत. परंतू महापालिकेच्या स्थायी कर्मचाऱ्यांपैकी उपायुक्तपदावर बसू शकणारे सर्व अधिकारी ऑगस्टपर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झालेल्या कारवाईत अडकले होते. या अधिकाऱ्यांना नियमानुसार पदोन्नती देणे शक्य नसल्याने उपायुक्तपदाच्या चारही पदांवर प्रतीनियुक्तीवर आलेले अधिकारी स्थानापन्न होते, मात्र महापलिकेच्या अधिकाऱ्यांपैकी संजय दोंदे यांची लाचलुचक प्रतिबंधक विभागाच्या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष सुटका केली. त्याचप्रमाणे विभागीय चौकशीतही त्यांना क्लिन चीट देण्यात आली. परिणामी उपायुक्त पदावरील एका प्रतिनियुक्त अधिकाऱ्याला परत राज्य सरकारकडे पाठवून सप्टेंबरमध्ये दोंदे यांची उपायुक्तपदावर नियुक्ती झाली. त्यामुळे महापालिकेच्या स्थायी कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी उपायुक्तपदी विराजमान झाला. मात्र हे उपायुक्तपद औटघटकेचेच ठरले कारण ३० सप्टेंबरला संजय दोंदे निवृत्त झाले. त्यामुळे ही जागा पुन्हा रिक्त झाली आहे.
वास्तविक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपैकी स्वप्निल सावंत, सुनील यादव, चंद्रकांत बोरसे हे अधिकारी उपायुक्त पदासाठी दवेदार आहेत. परंतू त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई याआधी झाली असून ते प्रकरण न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे त्यांना उपायुक्तपदी पदोन्नती देणे नियमानुसार अडचणीचे आहे. उपायुक्तपद जास्त काळ रिक्त ठेवता येणार नसल्याने पुन्हा एकदा या पदावर राज्य सरकारचा प्रतीनियुक्तीवरील अधिकारीच येण्याची शक्यता अधिक आहे.
महापालिकेला लाचखोरीचे ग्रहण
मिरा-भाईंदर पालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहेत. त्यात सध्या कार्यरत असलेल्यांपैकी स्वप्निल सावंत, सुनील यादव, चंद्रकांत बोरसे या अधिकाऱ्यांसह आनंद गभाले, गणेश गोडगे, राकेश त्रिभुवन, डॉ. प्रकाश जाधव, योगेश शिंदे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यातील अनेकांची न्यायालयाकडून अद्याप निर्दोष सुटका झालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.