‘मध्य वैतरणा’तून २६.५ मेगावॉट वीजनिर्मिती

‘मध्य वैतरणा’तून २६.५ मेगावॉट वीजनिर्मिती
Published on

‘मध्य वैतरणा’तून २६.५ मेगावॉट वीजनिर्मिती
पालिकेची वार्षिक ९ कोटी रुपयांची बचत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः मध्य वैतरणा धरण या ठिकाणी तरंगता सौरऊर्जा आणि जलविद्युतनिर्मिती असलेला संकरित ऊर्जा प्रकल्प मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यातून २६.५ मेगावॉट (संकरित) वीजनिर्मितीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होणे अपेक्षित आहे. पालिकेच्या या संकरित (हायब्रीड) वीजनिर्मिती प्रकल्पामुळे जवळपास नऊ कोटी रुपये वार्षिक बचत करणे शक्य होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मध्य वैतरणा धरणाच्या जलाशयातून मुंबईला दैनंदिन ४५५ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईच्या पाणीपुरवठा यंत्रणेत या धरणाचा ११ टक्के इतका वाटा आहे. या तलावाची एकूण साठवण क्षमता ही एक लाख ९३ हजार ५३० दशलक्ष लिटर इतकी आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी सौरऊर्जा आणि जलविद्युतनिर्मितीसाठी वैतरणा सोलर हायड्रो पॉवर जेनको कंपनीसोबत ऊर्जाखरेदी करार करण्यात आला आहे.
या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज प्रतियुनिट ४.७५ रुपये या समतुल्य दराने खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमार्फत ही वीज राज्याच्या ग्रीडला जोडून वाहून नेण्यात येईल, तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी (महावितरण) सोबत करार करण्यात येईल. वीजखरेदीसाठीचा महावितरणसोबतचा करार आगामी काळात करण्यात येईल. या वीजखरेदी करारामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे पांजरापूर जल शुद्धीकरण केंद्रात लागणारी वीजवापराच्या मोबदल्यात जवळपास नऊ कोटी रुपयांची बचत होणे अपेक्षित आहे.
सौरविद्युतनिर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी एकूण ६.५ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होणे अपेक्षित आहे. फ्लोटिंग सोलर या तंत्रज्ञानावर आधारित वीजनिर्मिती या प्रकल्पाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. एकूण ८.५ हेक्टर क्षेत्रफळाच्या पाण्यावर हा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प व्यापलेला असेल. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर प्रकल्प आधारित आहे. प्रकल्पाचे संचलन सुरू झाल्यापासून पुढील २५ वर्षांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी ही सेवा पुरवठादार कंपनीची असेल.

२० मेगावॉट वीजनिर्मिती
जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी १० मेगावॉटच्या दोन जनरेटरच्या माध्यमातून २० मेगावॉट इतकी वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित सर्व पर्यावरणीय, तसेच वैधानिक परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत या प्रकल्पाची वित्तीय निश्चिती होणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. दोन वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाच्या ठिकाणी वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com