

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी घोडबंदर रस्ता खड्डेमुक्त
पालिका प्रशासन सरसावले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी (ता. ५) ठाण्यात येणार आहेत. यासाठीच्या नियोजनात ठाणे महापालिकेसह जिल्हा प्रशासन गुंतले आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबरोबरच रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू झाले आहे. मोदींमुळे तरी घोडबंदरकरांचा प्रवास खड्डेमुक्त होणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
घोडबंदर कासारवडवली येथील बोरीवडे येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाण्यात येत आहेत. या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांच्या नियोजनासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार या ठिकाणी १०० बेडचे तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालय उभारले जात आहे. त्यात ठाणे पालिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत ठाणे परिवहन सेवेच्या ३२० बसने नागरिकांना आणले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टॉयलेट आदींसह पार्किंगची व्यवस्था उभारण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. यासाठी मुख्य कार्यक्रमाच्या आजूबाजूला असलेल्या मैदानांचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार या मैदानांच्या ठिकाणी एक हजार २०० बससह एक हजार चारचाकी व दुचाकी गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जात असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
अवजड वाहनांना बंदी
मोदी हे येणार असल्याने खड्ड्यात असलेला घोडबंदर रस्ता सध्या सुस्थितीत आणण्याच्या कामाला वेग आला आहे. साफसफाई, रस्त्यावरील धूळ काढण्याबरोबरच ज्या-ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे आहेत, ते खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी अवजड वाहनांनादेखील बंदी घातली आहे. त्यामुळे मोदी येईपर्यंत का होईना घोडबंदरकरांना कोंडीमुक्त आणि खड्डेमुक्त प्रवासाची हमी यानिमित्ताने मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.