पालिका आयुक्तांवर लाचखोरीचा आरोप
पालिका आयुक्तांवर लाचखोरीचा आरोप
आमदार महेश चौगुलेंकडून लोकायुक्तांकडे तक्रार
भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : भिवंडी- निजामपूर शहर महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात येत आहे. भिवंडी पश्चिमचे भाजप आमदार महेश चौगुले यांनी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य यांच्यावर पैसे घेऊन प्रस्तावित विकास आराखड्यात मनमानी पद्धतीने बदल केल्याचा आरोप केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई व ठाणे, लोकायुक्त, नगरविकास विभागाला आमदार महेश चौगुले यांनी दिलेल्या लेखी तक्रारपत्रात त्यांनी शहरातील सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित आराखड्यात सुरू झालेला मोठा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्याकडून उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच महापालिकेच्या प्रशासकावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
प्रस्तावित विकास आराखड्यात २०२३-४३ मध्ये शहराच्या वाढत्या लोकसंख्येत पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तसेच, काही राजकारण्यांसह भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने अत्यंत घाईघाईने विकास आराखडा तयार केल्याचे त्यांनी तक्रारपत्रात नमूद केले आहे. तसेच, बहुसंख्य लोकांना त्रास देण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी पालिका कार्यक्षेत्रांतर्गत अनेक भूखंडांवर अनावश्यक आरक्षण टाकले आहे. प्रस्तावित डीपीबाबत आठ हजारांहून अधिक लोकांनी डीपी सुधार समितीकडे तक्रारी केल्या आहेत. प्रस्तावित डीपीतील कोणत्याही भूखंडावर टाकलेले आरक्षण काढून टाकण्यासाठी लाखो रुपयांची मागणी केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
प्रस्तावित आराखड्यात कोणताही बदल करण्यासाठी समिती अध्यक्ष म्हणून आयुक्त अजय वैद्य यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आयुक्त वैद्य यांच्या इशाऱ्यावर काही दलालांकडून प्रस्तावित डीपीमध्ये कोणताही आरक्षित भूखंड घेण्यासाठी लाखो रुपयांची मागणी केली जात आहे, असा आरोप आमदार चौगुले यांनी केला आहे. अशा भ्रष्ट कारभारामुळे डीपीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाच सदस्यांची समिती स्थापन
आरक्षित जमिनीचे सर्वेक्षण करून डीपीतील तक्रारींची सुनावणी घेण्यासह पारदर्शक, वस्तुस्थिती दर्शक अहवाल तयार करण्यासाठी शासनाने प्रशासक अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर सरकारने नियुक्त केलेली पाच सदस्यीय चौकशी समिती विकास आराखड्याचा संबंधित अहवाल अध्यक्ष तथा आयुक्त अजय वैद्य यांना सादर करेल. समितीने सादर केलेल्या आवश्यक सूचना व अहवाल आयुक्त वैद्य पुढील कार्यवाहीसाठी नगरविकास विभागाकडे सुपूर्द करतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

