पेण-मुंगोशीतील ग्रामस्‍थ रस्‍त्‍याच्या प्रतीक्षेत

पेण-मुंगोशीतील ग्रामस्‍थ रस्‍त्‍याच्या प्रतीक्षेत
Published on

पेण, ता. ३ (वार्ताहर) : मूलभूत सोयी-सुविधा मिळत नसल्‍याने पेण तालुक्यातील मुंगोशी बौद्धवाडीतील ग्रामस्‍थांना उपेक्षितांचे जीवन जगावे लागत आहे. वाडीत जाण्यासाठी रस्‍ता नसल्‍याने ग्रामस्‍थांना विशेषतः ज्‍येष्‍ठ नागरिक, विद्यार्थ्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
बेलवडे ग्रामपंचायतीत येणाऱ्या मुंगोशी बौद्धवाडीतील नागरिक अनेक वर्षांपासून रस्‍त्‍याची मागणी करीत आहेत. पावसाळ्यात तर अक्षरशः झाडाझुडपातून, शेताच्या बांधावरून ग्रामस्‍थांना पायपीट करावी लागते. एखादी व्यक्‍ती आजारी पडल्‍यास अथवा गर्भवतीस रुग्‍णालयात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रस्‍त्‍याअभावी दळणवळणाच्या सुविधा नसल्‍याने गावातील अनेकांनी आपल्‍या मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी हॉस्टेलमध्ये ठेवले आहे. रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी अशा सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली आहेत; मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्‍याने ग्रामस्‍थांची पायपीट संपलेली नाही.

शंभर वर्षाहून अधिक काळ लोटला तरी बौद्धवाडीला हक्काचा रस्ता मिळालेला नाही, याठिकाणी व्यक्ती आजारी पडल्‍यास, त्‍याला झोळीतून न्यावे लागते. विद्यार्थी, महिला, कामगारांना पावसाळ्यात तीन-चार फूट वाढलेल्‍या गवत, झाडीझुडपांतून पायवाट काढत जावे लागते. रस्‍त्‍याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे अनेकदा अर्ज, निवेदने दिली आहेत; मात्र दुर्लक्ष होत असल्‍याने पायपीटीशिवाय पर्याय नाही.
- हिरामण भोजने, ग्रामस्थ, मुंगोशी बौद्धवाडी

मुंगोशी बौद्धवाडीतील ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी रस्ता नाही. आठ ते दहा शेतकऱ्यांच्या जागेतून रस्‍त्याचा प्रस्‍ताव असल्‍याने त्‍यांचा विरोध आहे. त्यामुळे अडचणी वाढल्‍या आहेत. मध्यंतरी प्रस्‍तावित रस्‍त्‍यासाठी वीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती; मात्र काम न झाल्‍याने ते परत गेले. रस्‍त्‍यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर अनेकदा चर्चा केली असून ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रही दिले आहे; मात्र अद्याप उत्तर आलेले नाही. रस्‍त्‍यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- हरीश पाटील, सरपंच, बेलवडे ग्रामपंचायत

उपोषणाचा इशारा
मुंगोशी बौद्धवाडीत अनेक वर्षांपासून हक्काचा रस्ता मिळत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या तालुका अध्यक्षा अश्विनी ठाकूर यांनी तहसीलदारांना निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला आहे. रस्त्यासाठी ग्रामस्थांनी २०१७ पासून संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही रस्ताची मागणी केली आहे. रस्‍ता नसल्‍याने ग्रामस्‍थ अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर रस्ता मंजूर करावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन तहसीलदार आणि गटविकास अधिकारी पंचायत समितीला देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com