

कंपनी मालकाला मारल्याने वडनेरे यांच्यावर गुन्हा दाखल
बदलापूर, ता. ३ (बातमीदार) : बदलापूर एमआयडीसी परिसरातील खासगी कंपनीत काम करणाऱ्या काही स्थानिकांना कोणतेही कारण न देता कामावरून काढण्यात आले. यावर नोकरी गमावलेल्या स्थानिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्याकडे तक्रार केली होती. वडनेरे यांनी कंपनी मालकाची भेट घेत चर्चा केली; मात्र या वेळी झालेल्या वादात कंपनी मालकाच्या अरेरावीवर चिडून वडनेरे यांनी कंपनी मालकाच्या कानाखाली मारली. याबाबत कंपनी मालकाने वडनेरे यांच्याविरोधात बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, तर स्थनिकांवर अन्याय होत असेल, तर गप्प बसणार नाही, अशी भूमिका वडनेरे यांनी घेतली आहे.
मागील महिन्यात १४ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्याकडे नोकरीवरून कमी केलेल्या स्थानिक तरुणांनी तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित एमआयडीसी परिसरातील कंपनीच्या मालकाशी वडनेरे व पक्ष कार्यकर्त्यांनी भेट घेत या स्थानिक तरुणांना नोकरीवरून कोणतेही कारण न देता काढून टाकण्याचे कारण विचारले, तसेच पुन्हा त्यांना कामावर रुजू करून घेण्यास सांगितले. या विषयावर प्राथमिक चर्चा होत असताना अचानक कंपनी मालकाने अरेरावी करायला सुरुवात केल्याने आपण रागाच्या भरात व मुजोरी दाखवणाऱ्या या कंपनी चालकांना धडा शिकवण्यासाठी थेट कानशिलात लगावली; मात्र कानशिलात लगवल्याचा राग व या प्रकरणात विनाकारण भाजप कार्यकर्त्यांनी प्रवेश घेत माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप वडनेरे यांनी केला, तसेच गुन्हा जरी दाखल झाला, तरी स्थानिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही आवाज उठवत राहणार, तसेच होणाऱ्या चौकशीसाठीदेखील मी सामोरा जाणार असल्याचे मत शैलेश वडनेरे यांनी व्यक्त केले.
जीवे ठार मारण्याची धमकी
कंपनी मालकाला वाचवण्यासाठी व स्थानिकांवर अन्याय होत असतानाही स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी या प्रकरणात मुद्दाम उडी घेणाऱ्या भाजपचे पदाधिकारी शरद म्हात्रे, अण्णा कुलकर्णी, भाविन पटेल यांनी मला ठार मारण्याचा कट रचला आहे. यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असल्याने मी याबाबत पोलीस तक्रार करणार असल्याचे वडनेरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.